Tuesday, June 14, 2016

जे. जे. रुग्णालयात रुग्णांवर जमिनीवरच उपचार

औषधांचा तुटवडा, उपचारांसाठी टाळाटाळ, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी ठरलेल्या वेळेत येत नाहीत, अशा तक्रारींमुळे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी काहीशी अवस्था झालेल्या भायखळय़ाच्या जे. जे. रुग्णालयातील रुग्णांच्या हालाला पारावार उरलेला नाही.
patient in jj hospitalमुंबई – औषधांचा तुटवडा, उपचारांसाठी टाळाटाळ, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी ठरलेल्या वेळेत येत नाहीत, अशा तक्रारींमुळे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी काहीशी अवस्था झालेल्या भायखळय़ाच्या जे. जे. रुग्णालयातील रुग्णांच्या हालाला पारावार उरलेला नाही. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत असताना व्यवस्थापनाकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याने अनेक गरजू रुग्णांना खाटेऐवजी जमिनीवर पथारी पसरून उपचार घेण्याची वेळ आली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी या संदर्भात संपर्क साधता त्यांनी उत्तर देणे टाळले.
जे. जे. रुग्णालयाच्या निष्काळजी यंत्रणेमुळे रुग्णांवर जमिनीवरच उपचार घेण्याची परिस्थिती ओढवते आहे, असे वाटते का?
जे. जे. रुग्णालयातील या चलता है कारभाराचा फटका शेकडो गरीब रुग्णांना बसत असून रुग्णसंख्येचा भार वाहण्यास प्रशासन समर्थ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी ठरलेल्या वेळेत उपचारासाठी उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना तासन् तास रांगेत तातकळण्यापलीकडे पर्याय राहत नसल्याच्या तक्रारी आहेत.
चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग (आयसीयू) सध्या १५-१६ रुग्ण दाखल आहेत. मात्र या रुग्णांच्या सुरक्षेविषयक कोणतीच काळजी घेतली जात नसल्याचे या वॉर्डाकडे फिरकल्यावर दिसते. अतिदक्षता विभागाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी सोय नसल्याने त्यांचे हाल होत असल्याच्या तक्रारी आहेत. आशिया खंडात नावाजलेल्या या रुग्णालयात मुंबई, नाशिक, जळगाव, पुणे अशा अनेक शहरातून लोक उपचारासाठी येतात. मुंबईत निवासाची सोय नसल्याने दिवसरात्र याच रुग्णालयाचा आसरा त्यांना घ्यावा लागतो. मात्र वॉर्डाबाहेर विश्रांती घेणा-या रुग्णांच्या नातलगांसाठी धड पंख्यांचीही सोय नाही.
मोबाईल बॅटरी चार्ज करण्यासाठी सुविधा नसल्याने रुग्णालयाबाहेर जावून इतर पर्याय शोधावे लागत असल्याने प्रचंड गैरसोय होत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. योग्य उपचार व पुरेशा सोयीसुविधांअभावी मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. सरकारी रुग्णालयात गरीब आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे उपचार मिळत असल्याने अनेक जे. जे रुग्णालयाची वाट धरतात. मात्र उपचार दूरच अनेक औषधेही बाहेरून आणावी लागत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. औषधे रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत न पोहोचता परस्पर ही औषध मागवून नातेवाईकांच्या हातावर औषधांची चिठ्ठी टेकवली जाते. या औषधांच्या नावाने पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment