आरती जाधव
रुग्णांच्या जखमेवर मायेची फुंकर
घालून त्यांची अहोरात्र सेवा करणा-या परिचारिका स्वत:च्या आयुष्यातील काळोख
विसरून इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करत असतात.
रुग्णांच्या
जखमेवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणा-या परिचारिका
स्वत:च्या आयुष्यातील काळोख विसरून इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करत
असतात. त्यामुळे रुग्णसेवा कोण करतं? असं विचारल्यावर डॉक्टरांच्या आधी नाव
येते ते परिचारिकांच.
आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात कितीही मोठे
संकट कोसळले तरी रुग्णसेवा करण्यापासून त्या कधीच मागे पाऊल घेत नाहीत.
पूर्वी रुग्णांची सुश्रुषा करणा-या या परिचारिकांकडे लोक डॉक्टरांचेच दुसरे
रूप म्हणून पाहत असे. परंतु, आता परिचारिकांचा दर्जा ढासळत चाललेला आहे.
याशिवाय, बदलत्या काळाच्या ओघात
परिचारिकांना भेडसावणा-या समस्यांमध्ये प्रकर्षाने वाढ झालेली आहे. जसे,
कामाच्या ठिकाणी अन्य सह-कर्मचा-यांकडून तर कधी-कधी रुग्णांच्या
नातेवाईकांकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मात्र, इतक्या वर्षात रुग्णालयात
परिचारिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासनाने कोणताही कायदा तयार
केलेला नाही. इतकेच नाहीतर तुटपुंज्या पगारात परिचारिकांना काम करावे
लागते. अशाप्रकारे रुग्णसेवेचे व्रत अंगीकारलेल्या परिचारिकांना सुखापेक्षा
दु:खाची झळ अधिक सोसावी लागत आहे, हे वास्तव आहे.
परिचारिका ही संकल्पना बाहेरच्या देशातून
आपल्याकडे आलेली आहे. मुळात, आपल्या बाळाला ताप आल्यावर अहोरात्र काळजी
करणारी माता ही सुद्धा एक परिचारिकाच आहे. मात्र, पूर्वीच्या सिनेमांमध्ये
किंवा नाटकांमध्ये विधवा किंवा एखादी अपंग स्त्री रुग्णांची सेवा करते, असे
दाखविण्यात यायचे. त्यामुळे समाजात परिचारिकांची प्रतिमा तितकीशी प्रकाश
पाडणारी नव्हती.
मात्र, सध्या सामाजिक आणि कौटुंबिक
बदलामुळे तसेच आजारांचे वाढते प्रमाण, वाढती लोकसंख्या यामुळे समाजात
रुग्णालये आणि परिचारिकांची गरज मोठया प्रमाणात निर्माण झाली आहे. याशिवाय
महिलांची प्रसूती याआधी घरातच व्हायची. परंतु, सरकारने जाहिरातींच्या
माध्यमातून बाळंतपण रुग्णालयातच करा असे सांगण्यात येत आहे. यावरून तरी
परिचारिकांना किती महत्त्व आहे, याचा अंदाज येतो. परंतु, परिचारिकांना
समाजातील व्यक्तींकडून जो मान आणि सन्मान मिळणे अपेक्षित आहे, तो मिळत
नाही.
केवळ जागतिक परिचारिका दिनानिमित्त
त्यांना विविध स्तरातून नावाजले जाते. पण, हे केवळ एका दिवसापुरतेच
मर्यादित असते. त्यानंतर दुस-यादिवशी पुन्हा ‘ये रे माझ्या
मागल्या..’अशाप्रकारे परिचारिकांना एक दिवसांचा सन्मान मिळण्यापेक्षा
शासनाने तिच्या अडचणी सोडविण्याकडे अधिक भर देणे आवश्यक आहे. राज्य सरकारने
परिचारिकांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या पाहिजेत.
परिचारिकांच्या कामाचे योग्य ते मूल्यमापन
आतापर्यंत सरकारने केले नाही. त्यांच्या कामाच्या मूल्यमापनासाठी
संशोधनात्मक दृष्टिकोन स्वीकारने गरजेचे आहे. परिचारिकांच्या कामाला
प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे. पालिका रुग्णालय असो किंवा सरकारी प्रत्येक
रुग्णालयात डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या
आहेत.
रुग्णांची सेवा करण्यासाठी ज्या ताकदीने
डॉक्टर प्रयत्न करतात त्याच मनोर्धेर्याने परिचारिका रुग्णांची सेवा करत
असतात. परंतु, डॉक्टरांच्या तुलनेत परिचारिकांना आवश्यक तो दर्जा अद्यापही
मिळालेला नाही. अपुरा पगार आणि कामाच्या ठिकाणी खराब वातावरण अशा विविध
समस्यांना परिचारिकांना सामोरे जावे लागत आहे.
पूर्वी बहुतांश रुग्णालयात केवळ कन्नड आणि
तामिळ भाषिक परिचारिका पाहायला मिळायच्या. मात्र, आता महाराष्ट्रातही
परिचारिकेचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुलींचा कल दिसून येत आहे.
डॉक्टरांच्याबरोबर परिचारिकांनाही अतिशय महत्त्व आहे. कारण, एक
शस्त्रक्रिया करायची झाल्यास एका डॉक्टरांना तीन परिचारिका मदत करण्यासाठी
असतात. त्या जोडीला जर परिचारिकांना सुद्धा मदतनीस मिळाल्यास त्या देखील
आपले काम अतिशय उत्तमरित्या करू शकतील.
परंतु, परिचारिकांचा तुटपुंजा पगार सोडा,
बरीच र्वष एकाच रुग्णालयात कार्यरत राहून सुद्धा अनेकांना पदोन्नती मिळत
नाही. परंतु, त्या तुलनेत कनिष्ठ डॉक्टर उशिरा येऊन बाजी मारून जातात.
परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लाखाच्यावरती खर्च होतो. अनेक
जणींना शिक्षणासाठी कर्ज काढण्याची वेळ येते. या कर्जाचा दरमहा हप्ता
अंदाजे सहा किंवा दहा हजार इतका असतो. पण प्रत्यक्षात त्यांना केवळ आठ
किंवा नऊ हजारांपर्यंत विद्यावेतन मिळते. हा पगार अत्यंत कमी आहे.
याशिवाय परिचारिका म्हणून काम करताना
संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून विशिष्ट प्रकारचा करार करण्यासाठी
भाग पाडले जाते. या करारादरम्यान अन्य रुग्णालयात उत्तम नोकरी मिळत असेल
तरी परिचारिका येथे जाऊ शकत नाही. कारण, रुग्णालयाच्या या कराराच्या बंधनात
त्या बांधल्या गेलेल्या असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना चांगल्या
नोकरीच्या संधीला मुकावे लागते.
याशिवाय रुग्णांची सेवा करताना एखाद्या
संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यास परिचारिकांना संरक्षण दिले जात नाही.
त्यामुळे रुग्णांची सेवा करताना त्यांना आजाराची लागण झाल्यास त्याला
जबाबदार कोण? याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे परिचारिकांना आरोग्य
विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी वारंवार परिचारिकांकडून करण्यात येत
आहे. मात्र, अद्यापही शासनाला याची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे
परिचारिका पेशाची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ असताना राज्याचे आरोग्य विभाग
शांत का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.
....................................................................................................................................................................
रात्रंदिनी आम्हा युद्धाच प्रसंग, असे
दिव्य दररोज रुग्णसेवेसाठी पार पाडणा-या परिचारिकांना आरोग्य विम्याचे
संरक्षण हवे, अशी मागणी परिचारिकांतून जोर धरत आहे.
विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची सेवा
बजावताना त्यांनाही एखादा आजार जडण्याची शक्यता असते. मात्र दुस-यांच्या
आरोग्याची काळजी वाहणा-या परिचारिकांच्या आरोग्याची हेळसांड सुरूच आहे.
वारंवार मागणी करूनही आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे असंख्य
परिचारिकांचे म्हणणे आहे.
स्वाईन फ्लू, क्षयरोगासारख्या संसर्गजन्य
आजार जडलेल्या रुग्णांची सेवा करताना परिचारिकांना स्वत:च्या आरोग्याची
काळजी घेणारे कोणतेच संरक्षण नाही. डॉक्टर व रुग्ण यांच्यात परिचारिका हाच
मुख्य दुवा असतो. प्रत्येक रुग्णाची योग्य काळजी घेणे हे परिचारिकेचे
कर्तव्य असते.
परिचारिकेकडून कोणतीही हलगर्जी झाल्यास
रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे परिचारिकांना कायम
सर्तक राहावे लागते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती मोठे संकट कोसळले तरी
रुग्णसेवा करण्यापासून ते कधीच मागे पाऊल टाकत नाही.
मात्र या परिचारिकांना आजाराची लागण
झाल्यास त्यांना कोणतेही आरोग्यविषयक संरक्षण शासनातर्फे अद्याप देण्यात
आलेले नाही. या परिचारिकांना संसर्गजन्य आजारांची लागण झाल्यास जबाबदारी
कुणाची, याचे उत्तर सरकारकडे नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या एखाद्या
परिचारिकेला मोठय़ा आजाराची लागण झाल्यास तिच्यावरील उपचाराचा खर्च कोण
करणार? आदी प्रश्न अनुत्तरित आहेत.
या परिचारिकांना आरोग्य विम्याचे संरक्षण
देण्याच्या मागणीसाठी येत्या २८ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे
सरकारविरोधात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र
गव्र्हनमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी सांगितले.
राज्यातील २ हजार परिचारिकांच्या बदल्या
विनंतीविना बदल्या करू नयेत, असे आरोग्य
मंत्र्यांनी स्पष्ट करूनही राज्यातील दोन हजार परिचारिकांच्या बदल्या
करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शासनाने या
बदल्या केलेल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या शासकीय सेवेत अंदाजित ३०,०००
परिचारिका कार्यरत आहेत.
त्यापैकी २४,००० परिचारिका आरोग्य विभाग व
वैद्यकीय क्षेत्रात काम करत असून उर्वरित सहा हजार जिल्हा परिषदेच्या
रुग्णालयात नियुक्त केल्या आहेत. बदल्या केल्यानंतर परिचारिकांना दुस-या
ठिकाणी कोणत्याही प्रकारची सेवा सुरक्षितता देण्यात आलेली नाही.
परिचारिकांच्या व्यथा
प्रत्येक रुग्णालयांत परिचारिकांना आठ तास
डय़ुटी करावी लागते. सतत उभे राहून काम केल्याने अनेक परिचारिकांना गुडघे व
सांधेदुखीचा आजार जडत आहे. परिचारिकांना कामाच्या ठिकाणी सह-कर्मचारी,
वरिष्ठ डॉक्टरांकडून आणि रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणा-या मानसिक
त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी
पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत असला तरी प्रत्यक्षात परिचारिकांना केवळ
आठ किंवा नऊ हजारच विद्यावेतन मिळते. हा पगार खूपच कमी आहे. मागील दहा
वर्षात विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली नाही.
तसेच एक ते दीड वर्षानी परिचारिकांच्या
बदल्या होत असल्याने संबंधित करारात सेवा सुरक्षेचा किंवा सेवेत समाविष्ट
करण्याबाबत कोणताही उद्देश नाही. त्यामुळे अनेकदा परिचारिकांना पदोन्नती
मिळण्यासाठी रखडपट्टी सहन करावी लागत असल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment