Tuesday, June 14, 2016

नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण भयावह

 
जन्माला आल्यानंतर अवघ्या २४ तासांत मरणा-या नवजात बालकांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहेत. भारतात दरवर्षी तीन लाख नवजात बालकांचा मृत्यू होत असून मुंबईसारख्या शहरी भागात बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.
संग्रहित छायाचित्र संग्रहित छायाचित्र
जन्माला आल्यानंतर अवघ्या २४ तासांत मरणा-या नवजात बालकांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहेत. भारतात दरवर्षी तीन लाख नवजात बालकांचा मृत्यू होत असून मुंबईसारख्या शहरी भागात बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.
नवजात बालकांचे मृत्यू होण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर असल्याची बाब समोर आली असतानाच मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरात २००८-१२ या चार वर्षात ३२ हजार ६६४ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालातून उघड झाली आहे.
विशेषत: माता-बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे कोटय़वधी रुपये खर्च केले जात असले, तरी महाराष्ट्रात होणा-या बालमृत्यूचे प्रमाण अक्षरश: चटका लावणारे आहे. नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता सरकारच्या बाल-माता संगोपन योजनेचे वाभाडे निघत आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ या स्वयंसेवी संस्थेच्या आकडेवारीनुसार, जगभरात पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या होणा-या मृत्यूंपैकी २४ टक्के मृत्यू भारतात होत असून जगभरातील नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये ३० टक्के मृत्यू भारतात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पूर्वीच्या तुलनेत सध्या भारतात २० टक्के जनता आजही उपाशीपोटी जीवन जगत आहे.
देशात पाच वर्षाखालील ३०.७ टक्के लहान मुले अपेक्षित वजनापेक्षा कमी वजनाची आहेत. तर ५८ टक्के बालकांचा विकास दोन वर्षापेक्षा कमी वयाचे असतानाच थांबतो. त्याशिवाय भारतातील चारपैकी एक बालक कुपोषणबाधित असून देशात दररोज तीन हजार मुलांचा कुपोषण आणि कुपोषणामुळे निर्माण होणा-या आजारांमुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
मुळात, नवजात बालकाची काळजी जन्मापासून २८ दिवसांपर्यंत अतिशय दक्षतेने घ्यावी लागते. या काळातील त्याची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण, या कालावधीत बालकांना जंतुसंसर्गाची लागण होण्याची दाट शक्यता असते. संसर्गजन्य आजार, न्युमोनिया, अतिसार, ताप व श्वसनविकारामुळे आतापर्यंत बहुतांश नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय, प्रसूतीदरम्यान होणा-या नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. या कारणास्तव प्रसूतीदरम्यान नवजात बालकांचा मृत्यू होऊ नये याकरिता सरकारने जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा अनेक योजना अमलात आणल्या आहेत.
महिलांची प्रसूती आरोग्य संस्थेतच करावी, याकरिता जनजागृतीवरही लाखो रुपये खर्च केले जातात. गर्भवती महिलाही सुरुवातीपासून सरकारी रुग्णालयातून तपासण्या करून घेत आहेत, तरी देखील नवजात बालकांचा मृत्यूदर रोखण्यास प्रशासनाला यश येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नवजात बालकांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करत असले, तरी हे प्रयत्न केवळ नावापुरतेच असल्याचे वाटते.
कारण, बालमृत्यू कमी करण्यासाठी निर्णय घेणा-या यंत्रणेलाच कीड लागली असून ही कीड दूर करण्याची ताकद सरकारमध्ये नाही. फक्त कागदोपत्री घोडे नाचवले जातात. मागील अनेक वर्षापासून नवजात बालकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही वाढती आकडेवारी पाहता सार्वजनिक आरोग्य विभाग किती कार्यक्षम आहे, याची कल्पना येते.
महत्त्वाचं म्हणजे, कुपोषण ही समस्या फक्त आदिवासी पाडय़ातील लहान मुलांमध्ये दिसून येते असे नाहीतर आता शहरी व ग्रामीण भागातही कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या कारणास्तव शिक्षण व आरोग्य सुविधांच्या अभावामुळे कुपोषण वाढत असल्याचे बोलणे अत्यंत चुकीचे ठरेल.
शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणासाठी अन्य काही घटकही तितकेच जबाबदार आहेत. यामध्ये अन्नपदार्थामधील पौष्टिकतेचा अभाव हा मुख्य घटक आहे. फक्त काहीतरी खाल्ल्याने शरीराचे पोषण होत नाही. किती खाल्ले यापेक्षा काय खाल्ले हे जास्त महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास आज सर्वसामान्यांच्या आहारात ज्या घटकांचा समावेश होतो, त्यामध्ये प्रथिने किंवा जीवनसत्त्वे किती प्रमाणात असतात, याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
गर्भारपणात महिलेने स्वत:च्या आहाराची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे बाळाला विविध आजारांना सामोरे जावे लागत असून यामुळेच नवजात बालकांचे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भात अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये मातांना रितसर प्रशिक्षण देण्यात येते.
मात्र, भारतात जन्माला आलेल्या अपत्याची सर्व जबाबदारी जन्म दिलेल्या मातेची असल्याचे मानले जाते. मात्र, दारिद्रय़, अज्ञान व अशिक्षित मातेला असलेल्या बाल संगोपनाविषयीच्या ज्ञानाचा अभाव, वेळेवर वैद्यकीय मदत व सल्ला मिळवण्यासाठी अडचणी यामुळे बालमृत्यूची समस्या अधिक गहन बनत चालली आहे.
वाढ खुंटलेल्या व कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी होण्याऐवजी सतत वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी गर्भवतीपणात स्वत:ची व गर्भातील बाळाची काळजी कशी घ्यावी, गर्भारपणातील व्यायाम, सकस आहार, गर्भारपणातील मनोरंजनाचे महत्त्व, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नये यांसारख्या अनेक विषयांवर गर्भवती महिलांना प्रशिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून मातेला योग्य प्रशिक्षण दिल्यास ५०-६० टक्के नवजात बालकांचे मृत्यू कमी करण्यास मदत होईल.
नवजात बालकांची काळजी
मूल जेव्हा गर्भात असते तेव्हा ते पूर्णत: आईवर अवलंबून असते. परंतु, जेव्हा नवजात बालकाचा जन्म होतो, तेव्हा त्याला बाहेरील वातावरणाशी जुळवून घेणे अत्यंत आवश्यक असते. अशावेळी त्याला श्वास घेणे, पोषणमूल्यांची उपलब्धता, समतोल हवामान याचा ताळमेळ बनणे गरजेचे असते. नवजात बालकांना आईचे दूध मिळणे हे अत्यंत पोषण आहार समजले जाते.
त्यामुळे मूल जन्माला आल्यानंतर त्याला सहा महिने आईचे दूध पाजणे अत्यंत आवश्यक असते. पहिल्या तीन दिवसात आईच्या दुधातून वरचे वर जाड स्वरूपाचा थर येतो. काही मातांना वाटते की हे दूध देणे गरजेचे नाही. मात्र, हे दूध देणे गरजेचे असते. त्यामध्ये अ,ब,क यांसारखे जीवनसत्त्वे असतात, जे बालकांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असते.
याशिवाय आई जेव्हा बाळाला दूध पाजते तेव्हा आईचा आहार संतुलित असावा. आईच्या आहारात कॅल्शियम किंवा आयर्न असणे गरजेचे असते. अशाप्रकारे आईने स्वत:सोबत बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment