Tuesday, June 14, 2016

‘डॉक्टर तुम्ही सुद्धा..’!


शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या नातलगांनी दारूच्या नशेत डॉक्टरांना मारहाण केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील; पण दारूडय़ांवर उपचार करून त्याला बरे करणारे डॉक्टर स्वत:च दारूच्या व्यसनात अडकले तर डॉक्टर व रुग्ण दोघांचेही काही खरं नाही.
doctorशासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या नातलगांनी दारूच्या नशेत डॉक्टरांना मारहाण केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील; पण दारूडय़ांवर उपचार करून त्याला बरे करणारे डॉक्टर स्वत:च दारूच्या व्यसनात अडकले तर डॉक्टर व रुग्ण दोघांचेही काही खरं नाही. तसाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी घडल्याचे समोर आले आहे.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणा-या तीन निवासी डॉक्टरांना नुकतीच पोलिसांनी अटक केली. नशेच्या भरात बेधुंद होऊन कार चालवत असल्याने पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याशी डॉक्टरांनी गैरवर्तणूक करून शिवीगाळ केली. हा संबंध प्रकार वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा..’ असे म्हणण्याची आता वेळ आली आहे.
हाजीअली जंक्शन येथे १८ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास जे.जे. रुग्णालयातील औषधे, अस्थिरोग आणि किरणोत्सर्ग या विभागातील तीन डॉक्टर ताडदेव विभागात दारूच्या नशेत कार चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. डॉ. शिव पंकज महेंद्र (२६), डॉ. वेद आशीष रविश (२८) आणि डॉ. राहुल जैन (२८) अशी या तिघांची नावे आहेत.
हे तिघेही प्रथम वर्गाचे निवासी डॉक्टर आहेत. त्यावेळी, रविश हा कार चालवत होता. अन्य दोघे जण मद्यधुंद अवस्थेत गाडीत बसले होते. पोलिसांनी रविशला ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर टेस्ट’ करण्यासाठी गाडीतून बाहेर यायला सांगितले असता त्याने नकार दिला. त्यानंतर रविश व अन्य डॉक्टरांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
ताडदेव पोलीस ठाण्यात या डॉक्टरांनी धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवसायाचा वसा उचलणारे डॉक्टर पोलिसांशी अशाप्रकारे वागू शकतात यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, हे असंच घडले आहे. कारण, ही घटना समोर आल्यानंतर जे.जे. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी उपअधिष्ठाता पदव्युत्तर व विभाग प्रमुख डॉ. एम. बी. तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली होती.
या चौकशी समितीने २१ ऑक्टोबर रोजी सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार या तिन्ही डॉक्टरांची रात्रपाळी असतानासुद्धा आपले कर्तव्य पार न पडता. तसेच कोणत्याही वरिष्ठ डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कामावर गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. दारूचे सेवन करून पोलिसांशी गैरवर्तणूक केली. त्यांच्या या गैरवर्तणुकीमुळे डॉक्टरांवरील लोकांचा विश्वास उडू लागला आहे. तसेच त्यांच्यामुळे संस्थेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या डॉक्टरांना त्यांच्या सेवेतून सहा महिने निलंबित करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
वैद्य हा ईश्वराचाच एक अंश आहे. रुग्णाला बरं करण्यासाठी तो स्वत:च्या जीवाचे रान करतो. परंतु, आता हेच डॉक्टर आपल्या मर्यादा ओलांडू लागल्याने वैद्यकीय क्षेत्रावर सामान्य नागरिकांचा उरलासुरला विश्वासही आता ढासळू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. विशेषत: डॉक्टरांनी मर्यादा ओलांडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा राज्यातील बहुतांश रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी स्वत:च्या वैद्यकीय व्यवसायाला विसरून चुकीचा मार्ग अवलंबला होता. आता हेच पाहा ना..
दारूच्या नशेत असलेला डॉक्टर रुग्णांना तपासताना बेशुद्ध पडल्याची घटना साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१२ साली घडली होती. याशिवाय, रुग्णांच्या उपचारासाठी आलेल्या डॉक्टरांनीच रुग्णालयात दारूची पार्टी केल्याचा प्रकार भाटिया रुग्णालयात डिसेंबर २०१२ रोजी घडला होता. अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र सुद्धा पाठवले होते.
भाटिया रुग्णालयाला लागून असलेल्या डॉक्टरांच्या वसतिगृहात हा प्रकार सुरू असायचा. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार तक्रार दाखल करूनही हा प्रकार न थांबल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर हा संबंध प्रकार सर्वासमोर आला. इतकेच नव्हे तर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचीच मधुशाला भरत असल्याची धक्कादायक प्रकार जुलै २०१३ साली उघडकीस आला होता.
या घटनांनंतर रुग्णाची मनोभाव सेवा करू, अशी शपथ घेऊन वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकणारे प्रशिक्षित डॉक्टरच अशाप्रकारचे गैरवर्तणूक करत असतील तर रुग्णांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? सर्वसामान्य गरजू रुग्ण पालिका रुग्णालयात स्वस्तात उत्तम उपचार मिळेल, अशी आशा बाळगून आलेला असतो. परंतु, या रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर डॉक्टरच जर रुग्णाप्रमाणे वाटला तर अशा रुग्णांनी कुठे जायचं, असा प्रश्न आता सर्वाना पडू लागला आहे.
त्यामुळे आता डॉक्टरांनी सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर रस्त्यावर उतरणारे डॉक्टर जर अविचारीपणाने वागत असतील, तर अशा डॉक्टरांची गय केली जाणार नाही. या कारणास्तव शासकीय रुग्णालयातील असो किंवा खासगी रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टराने आपल्यावर एखाद्या व्यक्तीच्या जीवाची जबाबदारी आहे, याचे भान ठेवून काम करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून ‘डॉक्टर व रुग्ण’ यांच्यातील ढासळत चाललेला विश्वास पुन्हा एकदा बळकट होईल.

No comments:

Post a Comment