Tuesday, June 14, 2016

आजारपण महागणार!


 हृदयविकार, कर्करोग व एचआयव्ही आजार नाही व्याधी या जीवघेण्या आजारावरील औषधांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. असे असताना या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना आयुष्यभर या औषधांचा आधार घ्यावा लागतो. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो.
MEDICINEहृदयविकार, कर्करोग व एचआयव्ही आजार नाही व्याधी या जीवघेण्या आजारावरील औषधांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. असे असताना या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना आयुष्यभर या औषधांचा आधार घ्यावा लागतो. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. मात्र, आता सरकारने जीवनावश्यक औषधांच्या आयात शुल्कावरील सवलत काढून घेतल्याने महागाईसह आता आजारही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्करोग व एचआयव्हीसह अन्य जीवनावश्यक औषधांच्या किमती १० ते २५ टक्क्यांनी महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी काळात या औषधांच्या किमतीत वाढ झाल्यास सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे अंदाजपत्रक कोलमडून पडेल. त्यामुळे, वैद्यकीय क्षेत्र ‘हायटेक’ झाले असले तरी जीव वाचवण्यासाठी रुग्णांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
दैनंदिन जीवनात आवश्यक असणा-या वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात आता आजारपणही महागणार असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात विविध आजारांनी नागरिकांना घेरायला सुरुवात केली आहे. पूर्वी व्यक्तीची पन्नाशी ओलांडली की आजार डोके वर काढत असे, पण आता लहान वयातच मुलं हृदय व कर्करोग यांसारख्या भयावह आजारांचे शिकार होऊ लागली आहेत. अगदी लहान वयात आजार झाल्याने मुलांचे बालपण तर हरवतेच त्याचसोबतच कुटुंबातील अन्य सदस्यही खचून जातात. वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली असून या आजारावर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
कारण, हृदयविकार असल्यास हृदयाचे प्रत्यारोपण करून रुग्णाला नव्याने जीवदान मिळवून देण्यात डॉक्टरांना आता यश मिळू लागले आहे. याशिवाय कर्करोगासारख्या भयंकर आजारावरही उपचार करणे शक्य आहे. एड्सची लागण झालेले रुग्णही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उत्तम आयुष्य जगू शकतात.
पण, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असो किंवा कर्करोगावर उपचारानंतर शारीरिक प्रक्रिया चांगल्यापद्धतीने सुरू ठेवण्यासाठी रुग्णांना आयुष्यभर औषधांवर जगावे लागते. ही औषधं प्रचंड महागडी आहेत. साधारणत: महिन्याला या औषधांचा खर्च २५ ते ३० हजारांच्या घरात येतो. त्यामुळे, जीवन जगताना रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड आर्थिक त्रासातून जावे लागते. त्यात आता केंद्र सरकारने कर्करोग व एचआयव्हीसारख्या गंभीर आजारावर जीवनरक्षक म्हणून उपयुक्त ठरणा-या एकूण ७४ औषधांवरील सीमा शुल्कात देण्यात येणारी सवलत काढून घेतली आहे. यामुळे जीवरक्षक औषधांच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. यातून देशातील औषधी उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल, असा सरकारने कयास लावला आहे. परंतु दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे, कर्करोग, एचआयव्ही व मधुमेहसारख्या गंभीर आजारांचा सामना करीत असलेल्या रुग्णांना आर्थिक फटका बसणार आहे.
केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क बोर्डाने मागील आठवडय़ात एक अधिसूचना जारी करून या ७४ औषधांवरील सीमा शुल्कातील सवलत परत घेण्यात येत असल्याचे घोषित केले. यामुळे किडनी स्टोन, किमोथेरपी, रेडिओथेरेपी, हृदयविकार, हाडांचे विकार, संसर्गजन्य आजारांवर आळा घालणारे औषध, अँन्टिबायोटिक्स, आतडय़ाचे व रक्तासंदर्भातील आजारावर असणारी एब्सिक्सिमॅब, रेबीजविरोधी इम्युनोग्लाबीन, एफएसआय, प्रोकार्बाजाईन व सॅक्विनावीर यांसारख्या औषधांच्या किमती वाढणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, सध्या हृदयविकाराचे प्रमाण प्रकर्षाने वाढताना दिसून येत आहे. या विकारासाठी उपयुक्त असे एकच घटक असलेले औषध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादित करतात. या औषधांच्या किमती सर्वसामान्य गरजू नागरिकांच्या खिशाला परवडण्याजोग्या नाहीत. कारण, समान घटक असलेल्या या औषधांची निर्माती विविध औषध कंपन्या एकसारखीच करतात. पण, विविध कंपन्यांनुसार या औषधांच्या किमतीत फरक पाहायला मिळत आहे. जसे, अ‍ॅमलोडीपेन हा घटक असणारी प्रॅमोडील २.५ एम.जी.च्या गोळीची किंमत ६० पैसे आहे. तर झायडस कॅडिया कंपनीच्या याच गोळीची किंमत १.२० पैसे आहे. तसेच अ‍ॅटॅनील घटक असलेले एफडीसी कंपनीची १४ गोळ्यांची किंमत ५ रुपये ४० पैसे आहे.
औषध एकच पण किमती वेगवेगळ्या यावर कोणाचेच नियंत्रण नाही. या वाढीचा फटका रुग्णांना बसणार असला तरी याचा फायदा कोणाला होणार हे सांगायची गरज नाही. मात्र, सध्या जीवनाश्यक ७४ औषधांसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय अजूनही लाल पाकिटात बंदिस्त आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यास रुग्णांचे आजारपणच मागणार आहे. त्यामुळे, रुग्णांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने पाऊल उचलण्याची गरज निर्माण
झाली आहे.

No comments:

Post a Comment