आरती जाधव
‘कर्करोग’ हा शब्द जरी कानावर
पडला तरी प्रत्येकांच्या हृदयाचा थरकाप उडतो. हा अत्यंत भयावह आजार
असल्याने कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला या आजाराची लागण झाल्यास रुग्णाची
शारीरिक स्थिती तर ढासळते, शिवाय संपूर्ण कुटुंब नैराश्येखाली जाते.
मुंबईत बहुतांश लहान मुलांना कर्करोगाची
लागण झाल्याचे समोर आले आहे. दूरवर खेडय़ापाडय़ात राहणा-या कर्करोगग्रस्त
मुलांना उपचारांसाठी टाटा रुग्णालय हाच पर्याय असतो. तसेच उपचारांसाठी बराच
कालावधी लागतो. अशावेळी घर व शाळा दूर राहिल्याने या मुलांचे शैक्षणिक
वर्ष वाया जाते. मात्र आता शिक्षणात खंड पडू नये याकरिता टाटा मेमोरियल
रुग्णालयाने कर्करोगग्रस्त मुलांसाठी रुग्णालयातच ‘पाठशाळा’ भरवली आहे.
त्यामुळे उपचार घेत असतानाच या मुलांना शिक्षणही पूर्ण करता येणार आहे.
कर्करोगावर उपचार करणारे मुंबईतील टाटा
रुग्णालय हे एकमेव रुग्णालय आहे. देशाच्या कानाकोप-यातून लोक उपचारासाठी
‘टाटा’च्या दिशेने धाव घेतला. दरवर्षी दोन लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार
करण्यात येत असून यात दोन हजार लहान मुलांचा समावेश आहे. लहान मुलांची ही
वाढती संख्या चिंता करायला लावणारी आहे. पण, सध्याची स्थिती पाहता अवघ्या
चार-पाच वर्षाची मुलेसुद्धा कर्करोगाने पीडित असल्याचे पाहायला मिळते.
दररोज रुग्णालयात व रुग्णालयाच्या आवारात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी
गर्दी केलेली असते.
घरी दिवसभर टीव्हीतील मनोरंजन,अभ्यास व
मित्र-मैत्रिणींच्या सोबत रममाण होणारी मुले रुग्णालयातील वातावरणात सतत
राहिल्याने कंटाळतात. कर्करोगाची लागण झाल्याने मुलांना कोणत्या ना कोणत्या
चाचण्या, केमोथेरपी अशा वेगवेगळ्या दिव्यातून जावे लागते. या कारणास्तव
अनेकदा मुलं हिरमुसतात. महत्त्वाचे म्हणजे कर्करोगावरील उपचारांना शरीराने
प्रतिसाद द्यावा याकरिता रुग्णांचे मन प्रसन्न असणे अत्यंत गरजेचे असते.
म्हणूनच मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी टाटा रुग्णालयाने खारीचा वाटा
उचलला आहे. सध्या रुग्णालयात ४५ कर्करोगग्रस्त लहान मुलांवर उपचार सुरू
आहेत. दूरहून उपचारांसाठी आलेल्या या मुलांचे कर्करोगासारख्या दुर्धर
आजाराशी झुंज देताना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या मुलांचे शैक्षणिक
नुकसान होऊ नये म्हणून रुग्णालयात या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली
आहे. जेणेकरून मुलांना गंभीर आजारपणाचा विसर पडण्यास मदत होईल.
कर्करोग हा संसर्गजन्य नसला तरी या
आजारासंदर्भात लोकांमध्ये प्रचंड गैरसमज असल्याचे समोर आले आहे. कारण,
कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता लहान मुलंही कर्करोगाच्या जाळ्यात
ओढली जातात. या आजारपणामुळे अनेक मुलांची शाळा व मित्र-मैत्रिणी दुरावतात.
मात्र, उपचार घेऊन ठणठणीत बरे झाल्यानंतर ही मुले पुन्हा शाळेत जाण्याची
नव्याने स्वप्न रंगवू लागतात. पण, ब-याचदा कर्करोगग्रस्त मुलांमुळे अन्य
मुलांनाही हा आजार होईल, असे सांगून उपचारानंतर कर्करोगमुक्त झालेल्या
मुलाला पूर्वीच्या शाळेत प्रवेश नाकारला जात असून अशा निंदनीय घटना घडल्या
आहेत. यातील एक उदाहरण म्हणजे, झारखंड येथे राहणारे विद्यानंद प्रसाद यांची
मुलगी अमरूशा हिला रक्ताचा कर्करोग झाला होता. उपचार करण्यासाठी तिला टाटा
रुग्णालयात आणण्यात आले.
उपचार पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हे कुटुंब
आपल्या मूळ गावी झारखंडला गेले. मात्र, मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात
आला. अथक प्रयत्नानंतर प्रवेश मिळाला; पण शाळेत मुलीला तुच्छपणाची वागणूक
दिली जात होती. अन्य विद्यार्थ्यांना कर्करोग होऊ नये म्हणून तिला शेवटच्या
बाकावर बसवले जायचे. अन्य मुलांसोबत बोलण्यास व खेळण्यासही तिच्यावर बंदी
घालण्यात आली होती. याशिवाय, शाळेत मुलीला फि-माफी सुद्धा दिली जात नाही.
याकरिता अमरूशाच्या वडिलांनी झारखंड सरकारला यासंदर्भात पत्र सुद्धा
पाठवले. मात्र, अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. अशा प्रकारच्या अनेक
घटना समाजात घडतही असतील. परंतु, या घटनांवर कधीही प्रकाश टाकला जात
नसल्याने समाजात घडणा-या या गोष्टींची सर्वसामान्यांना कल्पनाच नसते. ही
बाब लक्षात घेऊन आजारामुळे मुलांचे शिक्षण अपुरे राहू नये, याकरिता टाटा
रुग्णालयाने ‘पाठशाळा’ भरविली आहे. या शाळेत मुलांना चित्रकला, हस्तकला,
खेळ तसेच विविध गोष्टींची माहिती करून देण्यात येणार आहे. या शाळेत तीन
शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय टाटा रुग्णालय व कॅनशाळा या
स्वयंसेवी संस्थेच्या विद्यमाने सुरू केलेल्या या उपक्रमात कर्करोगबाधित
लहान मुलांसाठी परळ स्टेशनजवळ जगन्नाथ भाटकर शाळेतही वर्ग भरविण्यात येत
आहे. या शाळेत ४ ते १५ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत या शाळेत
तीन हजार मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. सध्या टाटा रुग्णालयातील २५
कर्करोगबाधित मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या रुग्णालयात सुरू केलेल्या
शाळेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही हा मुख्य
उद्देश आहे. तसेच उपचार पूर्ण झाल्यानंतर या मुलाला सरकारमान्य शिक्षण
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे, मुलाला नव्याने शाळेत प्रवेश
मिळवताना पालकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. विशेषत:
उपचारांसाठी येणा-या रुग्णांना योग्य सुविधा मिळावी, याकरिता टाटा रुग्णालय
सतत नवनवीन उपाययोजना राबवित असते. पण, आता लहान मुलांच्या शिक्षणात खंड
पडू नये, याकरिता ‘टाटा’ने उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे.
No comments:
Post a Comment