आरती जाधव
काही दिवसांपूर्वी मुंबईत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून दोघांना जीवनदान मिळाले.
मुंबई-
काही दिवसांपूर्वी मुंबईत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून दोघांना
जीवनदान मिळाले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये अवयव प्रत्यारोपणाबाबत जागरुकता
निर्माण होत असल्याचे चित्र जरी दिसून येत असले तरी अद्यापही मुंबईतील
अनेक रुग्ण मूत्रपिंड (२ हजार ८००), हृदय (२), यकृत (१९०)च्या प्रतीक्षेत
आहेत. पालिका रुग्णालयात, खासगी रुग्णालयांत दरवर्षी अवयवांची गरज असणा-या
हजारो रुग्णांची नोंद करण्यात येते.
एकीकडे अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची
संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे दात्यांची संख्या मात्र अपुरी
आहे. त्यामुळे, अवयवदानाबाबत समाजात जनजागृती होत असतानाच मुंबईसारख्या
शहरात अनेकांना अवयवांची वाट पाहावी लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवाची बाब
आहे.
अवयवदान केल्यास पुनर्जन्म झाल्यानंतर दान
केलेला अवयव आपल्याला नसतो, असा भ्रम लोकांमध्ये आजही कायम आहे. त्यामुळे,
अवयव प्रत्यारोपणासाठी कोणी पुढे येत नाही. लोकांमध्ये पसरलेला चुकीचा समज
याला कारणीभूत ठरत आहे.
याशिवाय धर्मात काहीच सांगण्यात न आल्याने
अवयवदान केल्याने धर्माच्या विरोधात गेल्यासारखे होईल, असे अनेकांना
वाटते. त्यामुळे, अवयवदान करणा-यांची संख्या गरजू रुग्णांच्या तुलनेत कमी
आहे. मुळात, मुंबईत वर्षभरात अवयवदानाच्या ३० ते ४५ घटना घडतात. ही
परिस्थिती पाहता लोकांना अवयवदानाचे महत्त्व पटू लागले आहे याबाबत कल्पना
येते.
मात्र, ही संख्या अपुरी असल्याने अजूनही २
हजार ८०० रुग्ण मूत्रपिंडांच्या तर १९० जण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, मागील महिन्यात चार जणांना हृदयाची गरज होती. यातील दोघांवर
मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. तर
अन्य दोन जण अजूनही हृदयाची वाट पाहत आहेत, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण
समन्वय समितीने(झेडसीसीटी) दिली.
केईएमधील ६० रुग्णांना हवे मूत्रपिंड
केईएम रुग्णालयात मूत्रपिंडांचे रुग्ण
वाढत आहेत. सध्या रुग्णालयात सुमारे ६० रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत
आहेत. आतापर्यंत साडेसातशे रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे दोन प्रकार
आहे.
एक ‘लाईव्ह रिलेटेड’ म्हणजे रुग्णाच्या
जवळच्या नातेवाईकांकडून मूत्रपिंड घेणे, तर दुसरा ‘कॅडेव्हर रिलेटेड’
म्हणजे डॉक्टरांनी ज्या व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केले आहे अशा रुग्णाचे
मूत्रपिंड नातेवाईकांच्या परवानगीनुसार गरजू व्यक्तीला देणे.
मात्र यात दात्याचे रक्तगट जुळणे
महत्त्वाचे आहे. कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून न आल्याने बरेचदा
मूत्रपिंड निकामी झाल्यावर रुग्णाच्या लक्षात येते. त्या वेळी बराच उशीर
झालेला असतो. अशा परिस्थितीत मूत्रपिंड वेळेवर उपलब्ध न झाल्यास रुग्ण
दगावण्याची दाट शक्यता असते, असे केईएम रुग्णालयातील मूत्रपिंड चिकित्सा
विभागाचे प्रा. डॉ. निवृत्ती हासे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment