Tuesday, June 14, 2016

राणी बागेत रात्रीच्या वेळी महिला सुरक्षारक्षक!


भायखळा येथील महानगरपालिकेच्या वीरमाता जिजामाता उद्यानातील ढिसाळ कारभार समोर आला आहे.
Jijamata-Udyanमुंबई – भायखळा येथील महानगरपालिकेच्या वीरमाता जिजामाता उद्यानातील ढिसाळ कारभार समोर आला आहे. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षारक्षकांच्या चार जागा आरक्षित असताना अतिरिक्त १५ महिला सुरक्षारक्षकांची भरती करण्यात आली आहे.
इतकेच नाहीतर जिजामाता उद्यानात रात्रीच्या वेळी लाईट नसतात. शिवाय उद्यानात कुठेही चौक्या नसतानाही रात्रीच्या वेळी महिला सुरक्षारक्षकांना तैनात केले जाते. शिवाय महिला कर्मचा-यांच्या सुरक्षेची जबाबदारी पुरुष सुरक्षारक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यकता नसताना अधिक प्रमाणात महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने पुरुष सुरक्षारक्षकांची अक्षरश: गळचेपी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राणी बागेच्या सुरक्षिततेसाठी एकूण ७२ सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. यातील चार जागा महिला वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून चार महिला सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वी पालिकेतर्फे रुग्णालयातील सुरक्षेसाठी नोकरभरती करण्यात आली होती. मात्र, भरती करण्यात आलेल्या काही महिला सुरक्षारक्षकांची जिजामाता उद्यानात नेमणूक करण्यात आली. त्यामुळे आरक्षित जागा चार असताना अधिक १५ जागा भरण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
उद्यानाच्या सुरक्षेसाठी कर्मचारी वर्ग अपुरा असून कर्मचा-यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. परंतु महिला सुरक्षारक्षकांची जबाबदारी अन्य सुरक्षारक्षकांवर सोपविण्यात येत असल्याने अतिरिक्त १५ महिलांच्या नेमणुकीवर पुरुष सुरक्षारक्षकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. केवळ ५० टक्के आरक्षणाच्या मुद्दय़ावर महिला सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रमुख सुरक्षा अधिकारी अरुण परशुराम वीर यांच्याद्वारे ही नेमणूक करण्यात आली असून या प्रकरणी अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment