May 2, 2016
आरती जाधव
वैद्यक क्षेत्रातील व्यक्तींनी
संशोधन केलेली औषधे, उपचारपद्धती व संबंधित अन्य महत्त्वपूर्ण संशोधन
वैद्यकीय विषयावरील नियतकालिकांमध्ये लिखित स्वरूपात मांडले जातात.
मात्र, वैद्यकीय नियतकालिकांत छापून आलेली
माहिती खरीच असते का? यासंदर्भात आता प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण,
केईएम रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाद्वारे ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणा-या
विद्यार्थ्यांनी एक संशोधन केले आहे.
यात आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय
विषयावरील शोधनिबंध लिहिण्यासाठी ३७ प्रकारचे निकष ठरवून दिलेले असतानाही
जगातील वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी नियतकालिके या
निकषांचे पालन करत नसल्याचे संशोधनात आढळून आल्याचा दावा ‘केईएम’ने केला
आहे. या संशोधनानंतर आता वैद्यकीय नियतकालिकांमध्ये सत्य माहिती असते का?
असा प्रश्न तज्ज्ञ डॉक्टरांना पडला आहे.
मागील वर्षभरापासून या रुग्णालयातील शिकाऊ
डॉक्टर व तज्ज्ञ डॉक्टर एकत्र मिळून ‘वैद्यकीय जर्नल’ या विषयावर संशोधन
करत आहेत. या संशोधनासाठी अनेक बाबींचा विचार करून जगातील सर्वाधिक
प्रसिद्ध दोन नियतकालिकांचा अभ्यास करण्याचे ठरवले. या दोन्ही
नियतकालिकांमध्ये मिळून ११३ शोधनिबंध आहेत.
हे सर्व लेख वाचल्यानंतर करण्यात आलेल्या
संशोधनात असे आढळून आले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यक विषयावर
शोधनिबंधाचे लिखाण करण्यासाठी आवश्यक नियमावलीचे पालन करण्यात आलेले नाही.
या संशोधनात वैद्यकीय जर्नलमध्ये लिहिलेल्या ८४ टक्के शोधनिबंधात रुग्णाला
औषध कोणी दिले याची माहिती नाही.
६० टक्के लेखात औषध उपचारपद्धतीसंदर्भात
लिहिलेले नाही. तर ७५ टक्के लेखात संशोधन कसे केले यासंदर्भात माहिती
दिलेली नाही. या कारणास्तव निकषाचे पालक न करता शोधनिबंध लिहिले असल्याचे
डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण ही नियतकालिके कोणती त्यांची नावे सांगण्यास
त्यांनी नकार दिला.
‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ मेडिकल एडिटर’ परिषदेत केईएमच्या संशोधनाचा गौरव
केईएममध्ये शिकाऊ डॉक्टरांना संशोधनात
गोडी निर्माण व्हावी म्हणून उन्हाळ्यात स्वतंत्र शिबिर भरवले जाते. या
शिबिरात बाहेरून आलेले तज्ज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना संशोधन कसे करतात,
त्यासाठी लागणा-या गोष्टी व विषयाची योग्य निवड कशी करावी, यासंदर्भात
मार्गदर्शन करतात. त्यानुसार आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या
नियतकालिकांवर संशोधन करायचे ठरवले.
त्यानंतर हे संशोधन करताना आम्ही
कोणकोणत्या गोष्टी करणार होतो याबाबत माहिती देण्यासाठी एक आराखडा तयार
केला होता. हा संपूर्ण आराखडा संबंधित अधिका-यांकडे पाठवण्यात आला. त्यांची
परवानगी मिळल्यानंतर संशोधनाला सुरुवात झाली. यात १० एमबीबीएस
विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
दोन्ही नियतकालिकांमधील निबंध वाचून
त्यातील त्रुटी काढण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. ऑक्टोबर २०१५ रोजी
दिल्लीत झालेल्या ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ मेडिकल एडिटर’ या आंतरराष्ट्रीय
परिषदेत या शिकाऊ विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनासाठी पुरस्काराने
गौरवण्यात आले आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत हे संशोधन सोशल मीडियावर
प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती ‘एमबीबीएस’चा विद्यार्थी पार्थ गाडा
याने दिली.
विविध क्षेत्रांतील डॉक्टरांनी केलेले
संशोधन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय जर्नलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर
शोधनिबंध लिहितात. या लेखांचे वाचन करून अनेक डॉक्टर यातून माहिती घेत
असतात.
अनेकदा ही उपचारपद्धत रुग्णांवरही वापरली
जाते. त्यामुळे या जर्नलवर करण्यात आलेल्या संशोधनात शोधनिबंध लिहिण्यासाठी
घालून दिलेले निकषांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांना माहिती देऊन ही बाब सांगण्यात
आली आहे.
- डॉ. ऊर्मिला थट्टे, प्राध्यापक, वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र विभाग
- डॉ. ऊर्मिला थट्टे, प्राध्यापक, वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र विभाग
No comments:
Post a Comment