May 10, 2016
आरती जाधव
२१ व्या शतकात पदार्पण केलेले
असले तरी महिलांच्या समस्या अद्यापही मावळलेल्या दिसून येत नाहीत.
अन्यायासह आता तिच्या शरीरात होणारे बदल व समस्यांशी तिचा लढा सुरूच आहे.
अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, संबंधित
‘स्त्री’ ही गृहिणी असो किंवा नोकरी करणारी असो, तिच्या आयुष्यात मानसिक
तणाव व नैराश्येची मुळे खोलवर रूजली गेलेली आहेत. त्यामुळे कुठेतरी आपला
कौटुंबिक व सामाजिक आधारस्तंभ ढासळू लागला आहे. कारण, २०१२ मध्ये एका
प्रकाशित केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात ५७ टक्के महिला मानसिक आजाराला
बळी पडत असल्याचे म्हटले होते. तर ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या
म्हणण्यानुसार दर पाच महिलांपैकी एक महिला तर दर १२ पुरुषांपैकी एक पुरुष
मानसिक आजाराला बळी पडतोय. यावरून मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण
चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
ऐंशी व नव्वदच्या दशकात महिलांना समाजात
अत्यंत तुच्छ स्थान दिले जात होते. घरात किंवा बाहेर पुरुष मंडळीच्या पुढे
बोलण्याचीही तिला मुभा दिली जात नव्हती. समाजात महिलांशी होणारा
भेदभावपूर्ण व्यवहार, घरगुती हिंसाचार व लैंगिक अत्याचार यासारख्या
गोष्टींमुळे सर्व वयोगटातील महिला अक्षरश: त्रासलेल्या असायच्या. पण त्या
कधीच मनातील भावना ओठावर येऊ देत नसल्याने अन्य लोकांना त्यांना होणा-या
वेदनेची जाणीव होत नसे व मनातील भावना मनातच राहिल्याने या महिलांना
नैराश्याचा सामना करावा लागलो.
पूर्वीची स्थिती आजही कायम आहे. उलट
एकविसाव्या शतकात लोक सुशिक्षित झाले आहेत. पण महिलांकडे पाहण्याचा
दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही. ‘स्त्री’ला आपल्याच लोकांकडून होणारे
अमानवीय आणि कटुतापूर्ण वर्तन यामुळे मानसिक आरोग्याची फार मोठी हानी होते.
देशात एकूण लोकसंख्येमध्ये महिलांची
संख्या निम्मी आहे. पण तरीही महिला अद्याप उपेक्षितच आहेत. महिला किंवा
तरुण मुलींचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ असावे, अशी धारणा मनात
बाळगणा-या पुरुषांची संख्या फारच कमी आहे. मानसिक आरोग्यात बिघाड निर्माण
करणारी शारीरिक आणि मानसिक हिंसा केवळ गृहिणी म्हणून काम करणा-या महिलांनाच
नाही तर आर्थिकदृष्टय़ा आत्मनिर्भर असलेल्या महिलांनाही झेलावी लागत आहे.
इतकंच नाही तर गृहिणीच्या तुलनेत नोकरदार
महिलांना मोठय़ा प्रमाणात पती व कौटुंबिक वादविवादांना सामोरे जावे लागतेय.
या कारणास्तव शहरात राहणा-या नोकरदार महिलांमध्ये मानसिक ताण व नैराश्य
जास्त प्रमाणात दिसून येते. हे नैराश्य आल्यावर अनेकदा महिला स्वत:शीच बोलू
लागतात, कोणी काही म्हटलं की लगेच त्यांची चिडचिड होते, ‘आता सर्व संपलेय’
असे मानून त्या आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात, या सर्व गोष्टी
मानसिक आजारातून घडत असतात. पण याची जाणीव नाही त्या महिलेला होते ना
कुटुंबातील अन्य सदस्यांना! कारण मानसिक आजार म्हणजे नेमकं काय? हेच मुळात
लोकांना माहीत नसते.
अनेकदा चुकीच्या समजुतींमुळे अनेक लोक
यावर उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे न जाता भोंदूबाबांचा आधार
घेतात. ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्युरो सायन्सेस’नुसार
भारतात दोन कोटींपेक्षाही जास्त लोक मानसिक अनारोग्याचे बळी आहेत. चिंताजनक
बाब म्हणजे महिलांमध्ये हे प्रमाण वेगाने वाढत आहे. अशा वेळी देशातील
महिलांच्या मानसिक आरोग्याला प्राथमिकता देणे अत्यंत गरजेचे आहे. पण
कौटुंबिक जबाबदारीमुळे बहुतांश महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
परिणामी त्या कालांतराने मानसिक रोगी बनू
लागतात. मानसिक आजार झाला म्हणजे व्यक्ती वेडी झाली असे मुळीच नव्हे..
एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केल्याने ती गोष्ट हळुवारपणे मनाचा ताबा
मिळवू लागते व अति ताणावर मनावरचा ताण वाढल्यास ती व्यक्ती मानसिक
व्याधींची शिकार होऊ लागते. यावर उपाय आहे.
मात्र, बरेच लोक समाजाचा विचार करून
मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे टाळतात. आजार बळावल्याने या व्यक्ती इतरांवरही
आघात करू शकतात. त्यामुळे मानसिक आजारावर वेळीच उपचार केल्यास व्यक्ती
यातून सुखरूप बाहेर येऊ शकते. त्यामुळे, महिलांनी स्वत:ची व कुटुंबातील
सदस्यांनी आपल्या कुटुंबातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
‘मानसिक आरोग्य कायदा’ अस्तित्वात
‘मानसिक आरोग्य कायदा’ अस्तित्वात
भारतात १९८२ साली पहिल्यांदा ‘राष्ट्रीय
मानसिक आरोग्य’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समाजातील लोकांमध्ये
मानसिक आरोग्यासंदर्भात जागरूकता निर्माण करणे हा या मागील मुख्य उद्देश
होता. त्यानंतर १९८७ मध्ये ‘मानसिक आरोग्य कायदा’ तयार झाला. तो
मनोरुग्णांशी संबंधित आहे.
पण तरीही आपल्याकडे मानसिक आजाराने
त्रासलेल्या व्यक्तींना या आजारातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक मानसोपचार
तज्ज्ञांची कमतरता आहे. सध्या जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मानसिक
रोगी आहेत. त्याचप्रमाणे पाच कोटी भारतीय अशा मानसिक अवस्थेशी लढत आहेत.
समाजात घडणा-या विविध घटनांमुळे मनावर परिणाम होत असल्याने भविष्यात मानसिक
रोगींच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होईल. २०२०पर्यंत नैराश्य हा दुसरा सर्वात
मोठा आजार असले, अशी शक्यता नाकारता येणार नाही.
No comments:
Post a Comment