आरती जाधव
सरकारी रुग्णालय असो किंवा खासगी
रुग्णालय सध्या उपचाराचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे रुग्णालयात जायचे
म्हटलं की, अंगावर काटा उभा राहतो.
परंतु, त्या त्यांना माहीतच नसतात.
त्यामुळे अनेकदा उपचाराविना एखाद्या रुग्णाचा मृत्यू होतो, अशा गरजू
लोकांना मार्गदर्शक ठरत आहेत राजीव पाटील. त्यांनी आतापर्यंत अनेक
रुग्णांना या योजनांमधून सवलतीत उपचार मिळवून दिला आहे. या पार्श्वभूमीवर
त्यांच्याशी प्रहार प्रतिनिधीने केलेली बातचीत..
सरकारी सवलती म्हणजे नक्की काय?
प्रत्येक रुग्णालयात उपचाराचा खर्च हा
ठरलेला असतो. परंतु, प्रत्येकी एक हजाराच्या मागे ५० टक्के सवलत आम्ही
संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून मिळवून देतो. मात्र, यासाठी काही
महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसे, संबंधित व्यक्ती द्रारिद्रयरेषेखालील असला
पाहिजे. तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तसे असेल तर संबंधित व्यक्तीकडे
उत्पन्नाचा दाखला, रुग्णालयात उपचारासाठी येणारा खर्च, रुग्णालयातील
वैद्यकीय समाजसेवकाचे पत्र असणे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रे तयार असतील
तर त्यांना या सवलतीचा लाभ सहज घेता येतो.
इतकेच नव्हे, तर कर्करोग, किडनी
प्रत्यारोपण, हृदयप्रत्यारोपण यांसारख्या विविध आजारांवरील उपचारांसाठी ही
सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर पंतप्रधानांकडून ५० हजारांच्या वर तर
मुख्यमंत्र्यांकडून २० हजारांच्या वर उपचारासाठी पैसे मिळतात. ही सर्व सवलत
मिळवून देण्याचे काम आम्ही स्वत: करतो.
रुग्णांच्या नातेवाइकांना कुठेही धावपळ
करण्याची गरज नसते. मुख्यत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठीच ही योजना आहे.
मुंबईत कामानिमित्त राहायला आले असतील; परंतु मूळचे यूपी, बिहार, राजस्थान
येथील असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांना जर उपचारात
सवलत पाहिजे असेल तर त्यासाठी त्यांच्या शहरातील आमदार, खासदार यांचे पत्र
अपेक्षित आहे.
या क्षेत्रात तुम्ही कसे आलात?
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माझ्या
नजरेसमोर एक घटना घडली. केवळ दोन-तीन वर्षाच्या मुलगा तापाने फणफणत होता.
त्या मुलाच्या आईने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यानंतर दोन
दिवसांनी मुलाचे वडील येऊन त्याला घरी घेऊन गेले. याबाबत चौकशी केली तेव्हा
कळलं की, उपचारासाठी पैसे नसल्याने मुलावर उपचार न करताच ते परतले.
काही दिवसांनी तो मुलगा दगावला. त्यामुळे,
कुपोषणामुळे मुलगा मरतो हे वैद्यकीय क्षेत्रातील अधोगती आहे. एकदा मला
माझ्या मित्राने दुरध्वनी केला, त्याच्या सात वर्षाच्या मुलाला धनुर्वात
झाला होता. हा आजार त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचला होता. कोकिलाबेन
रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याला २० ते २५ लाख रुपये
शस्त्रक्रियेसाठी खर्च येणार होता.
शस्त्रक्रिया केली नाहीतर आयुष्यभर
अंपगत्व मुलाच्या पदरात पडले असते. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने आर्थिक
सहाय्य केले आणि त्यानंतर मुलांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली.
दीड ते दोन महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता तो अत्यंत
ठणठणीत आहे. मात्र, त्या घटनेनंतर कळलं की, रुग्णालयात येणा-या सर्वसामान्य
रुग्णांना पैशापायी उपचार करता येत नाही. अशाकरिता काही करावं म्हणून मी
समाजसेवा या क्षेत्राकडे वळतो. तेथूनच माझ्या आयुष्याला नवीन गती मिळाली.
सध्या वर्षभरापासून मी प्रथम संस्थेत काम करत आहे.
तुमच्या या क्षेत्रात येण्यामागील मुख्य उद्देश?
वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली असताना
सुद्धा कुपोषणाचे आजही अनेक लहान मुलं बळी ठरत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी
बाब आहे. कारण, लहान मुलं देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे लहान मुलं आणि
वृद्धांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा
होती.
याशिवाय, आयुष्यात केवळ पैसा कमवणे हाच
एकमेव उद्देश नसावा. आपण या समाजात जन्माला आलो आहोत. या समाजासाठी आपण
काही देणं लागतो. या भावनेने प्रत्येकाने काम केले पाहिजे. इतकंच नव्हे तर
श्रीमंत माणसांच्या तुलनेच गरीब व्यक्ती उपकाराच्या बाबतीत अधिक महान
असतात.
रुग्ण तुमच्याकडे येतात की तुम्ही स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचता?
कधी एखाद्या व्यक्ती अडचणीत असल्याचे
नजरेस पडते. तेव्हा त्यांनी मदत मागण्याआधी आम्ही जाऊन त्यांना मदत करतो.
तसेच समाजसेवेत असल्याने अनेक मंडळी ओळखीच्या आहेत. केईएम, वाडिया किंवा
नायर रुग्णालयात सरकारतर्फे एक समाजसेवक नेमलेला असतो.
इतकेच नव्हे तर खासगी रुग्णालय जसे.
कोकिलाबेन असो किंवा लीलावती असो या रुग्णालयांमध्ये सुद्धा समाजसेवक
कार्यरत आहे. आम्ही सर्व जण एकमेकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे एखाद्या
व्यक्तीला अडचण असल्याने ते लगेचच एकाकडून दुस-याला कळते. त्यानुसार आम्ही
व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीनुसार कुठे हलवायचे हे ठरवतो.
याशिवाय सरकारी किंवा पालिकेच्या
रुग्णालयात दूरहून लोक उपचारासाठी येतात. परंतु, उपचाराचा खर्च त्यांना
परवडणार नसतो. अशावेळी उपचार न करताच काही जण गावी परतात. त्यासाठी आम्ही
प्रत्येक रुग्णालयात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत.
नव्या पिढीला समाजसेवेबाबत कोणता संदेश द्याल?
तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.
महाविद्यालयात शिकणारी युवा-युवती दररोज १०० रुपये खर्च करतात. त्यांनी ते
पैसे जमा करून गरजुंना दिले पाहिजेत. तसेच भजनी मंडळी, महिला बचत गट यांनी
सुद्धा पैसे जमवून एखाद्या गरीब व्यक्तीला द्यावे. या समाजासाठी आपण
काहीतरी केले पाहिजे, अशी भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाली
पाहिजे.
‘मी काय कोणाला देणार.., ‘माझ्याकडे काय
आहे..’ हा दृष्टिकोन आधी बदलणे गरजेचे आहे. पैसे देऊ शकत नसालं तर एखाद्या
गरजू व्यक्तींशी आपुलकीने बोललात तरी खूप आहे. परंतु, हे केवळ सांगून होणार
आहे. प्रत्येकाला तसं मनापासून वाटणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक जण
निरोगी आयुष्य जगू शकतो. परंतु, आता माणसाने ठरवावं कसं जगायचे..
No comments:
Post a Comment