Thursday, April 21, 2016

अल्पवयीन मुली आणि गर्भपात!




भारतीय संस्कृतीत ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असं म्हटलं जात होतं. मात्र, आता सोळा वर्षाखालील तरुणी धोक्याच्या वळणावर येऊन ठेपली आहे.
muliभारतीय संस्कृतीत ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असं म्हटलं जात होतं. मात्र, आता सोळा वर्षाखालील तरुणी धोक्याच्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण, मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वर्षभरात १५ वर्षाखालील १८५ मुली तर १९ वर्षाखालील १६०० तरुणींनी गर्भपात केल्याचे समोर आले असून २०१३-१४च्या तुलनेत यंदाच्या वर्षी गर्भपातामध्ये ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुळात मुंबईसारख्या शहरात बालविवाहाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. परंतु तरीही लहान मुलींमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. इतकेच नव्हेतर सरकारतर्फे ‘जननी शिशू सुरक्षा’ कार्यक्रम राबविण्यात येत असताना अल्पवयीन मुलींसह महिलांमध्येही गर्भपाताचे वाढते प्रमाण चटका लावणारे आहे.
२०१४-१५ मध्ये मुंबईतील तब्बल ३० हजार महिलांनी विविध कारणास्तव गर्भपात केला आहे. हा प्रकार समाजरचनेला धक्का देणारा आहे. या पार्श्वभूमीवर याची सर्व जबाबदारी पालकांवरच आहे. त्यांनी आपल्या पाल्यावर योग्य लक्ष न दिल्याने कुमारिका मातांचे गर्भपात मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसून येत आहेत.
सुरक्षित गर्भपात हा प्रत्येक महिलेचा हक्क आहे. गर्भपाताचे धोके टाळण्यासाठी सरकारने १९७१ मध्ये वैद्यकीय गर्भपाताविषयी कायदा मंजूर केला. त्यानुसार, पूर्वी गुन्हा मानल्या जाणाऱ्या गर्भपाताला सरकारी मान्यता मिळाली. तसेच विशिष्ट नियमांचे पालन करून कोणत्याही सरकारी दवाखान्यात तो करता येतो. यामागे बेकायदेशीर मार्गाने गर्भपात रोखून स्त्रियांच्या आरोग्याला होणारे धोके कमी करणे हा मुख्य हेतू होता.
विशेषत: राज्यात सरकारमान्य चार हजार २९ तर सरकारी ८३९हून अधिक गर्भपात केंद्रे आहेत. येथे गर्भधारणेनंतर बारा आठवडय़ांच्या आता कोणतेही कारण न देता गर्भपात करता येतो. परंतु, बारा आठवडय़ानंतर मात्र फक्त वैद्यकीय कारणांवरून डॉक्टरांनी सुचविल्यास गर्भपात केला जातो.
मात्र, मागील काही वर्षात काही डॉक्टरांनी अवैधरित्या स्वत:चे गर्भपात केंद्र उघडून गैरपद्धतीने गर्भपात करू लागले आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील अधिकृत गर्भपात केंद्रात झालेल्या गर्भपाताची आकडेवारी जरी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात अधिकृत आणि अनधिकृत गर्भपात केंद्रात होणा-या गर्भपाताबाबत जाणून घेतले तर ही आकडेवारी तिप्पट आढळून येईल यात शंकाच नाही. तसेच सरकारने विवाहाचे वय निश्चित केलेले असतानासुद्धा शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्यापही काही ठिकाणी अल्पवयीन मुलींचे लग्न करून देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच लग्न झाल्याने गर्भधारणा वयाच्या आधी होते, मग अशावेळी गर्भपाताचे प्रमाण वाढते.
अनेकदा तरुणी गोपनीयता बाळगून खासगी रुग्णालयात गर्भपात करून घेतात. त्यामुळे पालिकेपेक्षा खासगी गर्भपात केंद्रात जाऊन गर्भपात करणाऱ्या मुलींची संख्या पाहिली तर ती याहून अधिक असेल. दरम्यान, अल्पवयीन मुलींमध्ये असलेला लैंगिक शिक्षणाचा अभाव, लैंगिक छळ,बालविवाह हे गर्भधारणेचे मुख्य कारण आहे.
अल्पवयीन मुलींचे सध्या वाढत असलेले गर्भपाताचे प्रमाण पाहता हे लैंगिक छळ किंवा अनैतिक संबंधाचा परिणाम आहे. त्यात आताच्या जगात अनेक गोष्टींची नव्याने भर पडली आहे. जसे, सध्याच्या तरुणी आंधळेपणाने प्रेमात पडतात. त्यामुळे लग्नापूर्वीच शारीरिक संबंध ठेवतात, यातून गर्भधारणा झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणी खासगी औषध दुकानदारांकडून गर्भपाताच्या गोळ्या घेऊन गर्भ पाडतात. त्यामुळे लहान वयात गर्भपात केल्याने मुलींच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असते.
शिवाय अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दुकानदारांना औषध देण्यास बंदी घातली असताना गर्भपातावरील गोळ्या दुकानात मिळत असल्याने त्यावरही बंदी घालणे गरजेचे आहे. याशिवाय अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार यामुळे मोठय़ा प्रमाणात गर्भपात होत आहेत. परंतु, अल्पवयीन मुलींवर वाढत्या वयात होणारे अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
२०११-१२ मध्ये मुंबईत एकूण गर्भपाताचे प्रमाण १७,३०९ होते. चार वर्षात यात लक्षणीय वाढ झाली असून २०१४-१५ मध्ये गर्भपाताचे प्रमाण ३०,७४२पर्यंत पोहोचले आहे. वारंवार अशा गर्भपातामुळे महिला मोठय़ा प्रमाणात मानसिक आणि शारीरिक त्रासाला बळी पडत असल्यामुळे मुंबईतील सर्वच शाळांमध्ये आता लैंगिक शिक्षण सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शालेय जीवनापासून समुपदेशन करून गर्भपात होणारच नाही किंवा तशी वेळ महिलांवर येणारच नाही या दृष्टीने समुपदेशन वाढविण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे.
 याशिवाय आजच्या तरुण-तरुणींच्या मनात आणि प्रत्यक्षातही लैंगिक जाणिवा आणि इच्छा यांचे वास्तव काय आहे हे समजून घेणे अत्यंत निकडीचे आहे. तिथे सगळं आलबेल आहे, असे मानणं चुकीचे ठरेल.

No comments:

Post a Comment