Tuesday, June 14, 2016

बर्फ विक्रेत्यांवर कारवाईचा हक्क कोणाकडे?


गेल्या वर्षी स्वाईन फ्लू, लेप्टो, डेंग्यू व मलेरिया यांच्यासारख्या साथींच्या आजाराने राज्यातील जनतेला हैराण केले होते. यंदाच्या वर्षी पुन्हा आजारांचा प्रकोप होऊ नये याकरिता पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. कारण, पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ९२ टक्के बर्फ विक्रेत्यांजवळील बर्फात त्रुटी आढळून आल्या होत्या. अनेक साथीचे आजार हे दूषित पाण्याच्या संसर्गामुळे होतात. या कारणांमुळे बर्फात दोष आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी बर्फ व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेने आता राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ला सोपवली आहे. यासंदर्भात एफडीएला रितसर पत्र लिहून कळवले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, या पत्रासंदर्भात एफडीए प्रशासनच अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसत आहे. यावरून बर्फ विक्रेत्यांवर कारवाईची जबाबदारी पालिकेने झटकून एफडीएकडे ढकलली. पण एफडीएला याची पुरेशी कल्पना नसल्याने बर्फ विक्रेत्यांवर नक्की कोण कारवाई करणार, असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे. 
Ice Storageअशुद्ध पाण्यामुळे पसरणा-या साथींच्या रोगासंबंधात सर्वानाच ठाऊक आहे. पण उघडय़ावर अन्न शिजवून त्याची विक्री करणारे फेरीवाले दूषित पाणी वापरतात. मागील वर्षी अनेक ठिकाणी वापरण्यात आलेल्या पाण्यामध्ये ई-कोलाय सापडल्यामुळे पालिकेने रस्त्यांवरील फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली होती. याअतंर्गत रेल्वे परिसरातून तब्बल १५ हजार फेरीवाल्यांना हटवण्यात आले होते, तर १,५०० हातगाडय़ाही पालिकेने जप्त केल्या होत्या. यात सीएसटी, चर्चगेट, सबवे परिसर, दादर, कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, बोरिवली, अंधेरी, कांजूरमार्ग, विक्रोळी, चर्नी रोड, रे रोड या परिसरातील फेरीवाल्यांचा समावेश होता. मात्र, तरीही साथींच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात पालिकेचे आरोग्य विभाग अक्षरश: अपयशी ठरले होते. रोगांचा प्रसार व रुग्णांची वाढती संख्या यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पाहायला मिळत होते. त्यात जानेवारी २०१५च्या सुरुवातीपासून स्वाईन फ्लू या आजाराने डोके वर काढले होते. हा संसर्गजन्य आजार असल्याने याचा प्रसारही झपाटय़ाने होत होता. स्वाईन फ्लूची व्याप्ती कळून न आल्यावर त्यावर उपाययोजना करण्यास विलंब लागला. एके ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णालयात खाटांची अपुरी संख्या तर डॉक्टरांची कमतरता यामुळे चारी बाजूंनी अडचणी दिसत होत्या. वेळेवर निदान व उपचार न झाल्याने मुंबईत ६०० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. यातच दूषित पाण्यामुळे होणा-या आजाराच्या रुग्णसंख्येतही मागील वर्षी प्रचंड वाढ पाहायला मिळाली होती. यात लेप्टो, गॅस्ट्रो मलेरिया व हेपेटायटीस या आजाराचा समावेश होता. यंदाच्या वर्षी तर मे महिन्यात रुग्णसंख्येत भरमसाट वाढ दिसून येत आहे. या कारणास्तव पावसाळा सुरू झाल्यावर रुग्णांची संख्या अधिकच वाढू शकते, हे लक्षात घेता महापालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व वॉर्डात बर्फ विक्रेते, हॉटेल्स, फ्रुड ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, डेअरी, मिठाईची दुकाने, बफ गोळेवाले, लस्सी-ताक विक्रेते आणि फास्ट फूड सेंटर्स यांची पाहणी करून ९४८ बर्फाचे नमुने जमा केले. या पाहणी अहवालात ९४८ पैकी ८७० बर्फाच्या नमुन्यात म्हणजेच ९० टक्के नमुन्यांमध्ये ई-कोलाय हा जीवाणू आढळून आला होता. तर पाण्याच्या ४८ टक्के नमुन्यांमध्ये दोष आढळला होता. ई-कोलाय या जीवाणूमुळे गॅस्ट्रो, अतिसार, कावीळसारखे जलजन्य आजार पसरण्याचा धोका असल्याने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बर्फ हा अन्नपदार्थामध्ये येत असल्याने विक्रेत्यांवर आणि कारखान्यांवर कारवाईसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने एफडीएला पत्र लिहून आदेशही दिला आहे. पण पालिकेने पाठवलेल्या पत्रासंदर्भात एफडीएने काहीच माहीत नसल्याचे दाखवत हात वर केले आहेत. यावरून पालिका प्रशासनाने एफडीएवर कारवाईची जबाबदारी ढकलत हात वर केले, असेच म्हणावे लागेल. पण एफडीएला सुद्धा यासंदर्भात माहिती नसल्याने निकृष्ट दर्जाचे बर्फ विकणा-या विक्रेत्यांवर कारवाई कोण करणार? अशा प्रश्न पडू लागला आहे. याशिवाय दूषित पाण्याची ही समस्या केवळ शहरी भागाच्या तुलनेच ग्रामीण भागात जास्त आहे. त्याच ग्रामीण भागात लोक जलस्त्रोतांच्या माध्यमातून पाणी भरतात. पण हे पाणी अनेक वेळा अशुद्ध असते. त्यामुळे खेडय़ापाडय़ात आजारांचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होतो. दरम्यान, पाणी पिण्यास अयोग्य असून या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करण्यात येऊ नये, अशा पाटय़ा लावून प्रशासन आपल्या जबाबदारीतून मुक्त होतात. पण नागरिकांचे काय? याचा विचारच कोण करत नाही. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे अनेक गावात पाण्याची कमतरता असल्याने लोक नाईलाजाने दूषित स्त्रोतांवरील पाण्याचा वापर करतात. त्यामुळे, गेल्या काही काळात गॅस्ट्रो व अतिसाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने लक्ष घालून शहरासह गावखेडय़ांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, पालिका प्रशासनाने आजारांचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष मोहीम तर राबवली. पण या मोहिमेंतर्गत दोषी ठरलेल्यावर कारवाई करण्याची सोडून ही जबाबदारी एफडीएकडे सोडून आपले काम पूर्ण झाल्याचे दाखवून दिले. तर एफडीए सुद्धा हे माझे काम नसल्याचे सांगत गप्प बसून राहिले. दोन्ही प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांच्या आरोग्यांवर परिणाम होऊ शकतो. या कारणास्तव प्रशासनावर विसंबून राहण्यापेक्षा आता मुंबईकरांना आरोग्याशी काळजी स्वत:लाच घ्यावी लागणार आहे, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.
डॉक्टर काय म्हणतात…
अशुद्ध पाण्याच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यात कॉलरा, जुलाब, डायरिया, मुतखडा यांसारख्या आजारांचा समावेश आहे. याशिवाय दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. हे टाळण्यासाठी फिल्टरचे पाणी किंवा उकळलेले पाणी प्यावे. हात स्वच्छ धुवावेत. भांडी नेहमी स्वच्छ ठेवावीत. नळ, विहिरीचे पाणी किंवा बोअरच्या पाण्याच्या प्रयोगशाळेत चाचण्या करून ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे पाहावे. मगच पाण्याचे सेवन करावे.

No comments:

Post a Comment