Tuesday, June 14, 2016

‘घटस्फोट’ ठरतो हृदयविकाराचे कारण!

घटस्फोट हा कुणासाठीही आनंदाचा निर्णय नसतो. यामुळे संपूर्ण कुटुंब दुखावलं जातं आणि उद्ध्वस्त होऊ शकतं. मात्र, सध्या ‘चट मंगनी पट ब्याह’चा जमाना सुरू असून आता चट ब्याह पट तलाक असा नवा ट्रेंड रुजू लागला आहे.
DIVORCEघटस्फोट हा कुणासाठीही आनंदाचा निर्णय नसतो. यामुळे संपूर्ण कुटुंब दुखावलं जातं आणि उद्ध्वस्त होऊ शकतं. मात्र, सध्या ‘चट मंगनी पट ब्याह’चा जमाना सुरू असून आता चट ब्याह पट तलाक असा नवा ट्रेंड रुजू लागला आहे. एकमेंकांशी जुळून घेणे शक्य होत नसल्याने परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. अशावेळी लग्नाचे बंधन तोडले तर लोक काय म्हणतील..
आपल्याला आणि मुलांना कोण पोसणार?, एकटे राहणे म्हणजे खाऊ आहे का.. महिलांच्या समोरील हे चिंतेचे कारण हळूहळू हद्दपार होऊ लागले आहे. समाजात वावरणा-या महिलांना पाहिल्यावर हे सहज लक्षात येते. मात्र, काही महिला आपले दु:ख चेह-यावर दाखवत नसले तरी नातं तुटल्याने ते मनाने अक्षरश: खचून गेलेल्या असतात. आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याची इच्छा जणू काही संपलेली असते.
विशेषत: महिला आपले दु:ख कुटुंबातील व्यक्तीला किंवा जवळच्या मित्रमंडळींना सांगत नाही. त्यामुळे, काही गोष्टी वेळीच बोलून मोकळ्या न केल्याने आणि मनात कुजत ठेवल्याने महिला नैराश्याच्या आहारी जायला लागतात. कालांतराने त्या विविध व्याधींच्या शिकार होतात. मुख्यत: हृदयविकारचा झटका येऊन महिलांचा मृत्यू होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे, असे अमेरिकेतील एका संस्थेने नुकत्यात केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे.
देशातील मेट्रो सिटीपासून गावखेडय़ांपर्यंत आणि उच्चभ्रूपासून मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वत्रच घटस्फोटाचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या बदलत्या युगात मुलं-मुली उच्चशिक्षित असल्याने त्यांच्या अपेक्षाही मोठय़ा आहेत. त्यामुळे आज पती-पत्नी स्वतंत्र विचारसरणीचे झाले आहे. आपल्या निर्णयात कोणाचीही लुडडूब त्यांना सहन होत नाही. अशी लुडबूड होत असेल तर भांडण करून रोज दिवस ढकलण्यापेक्षा बहुतेक जण वेगळे राहणे ते पसंत करतात.
त्यामुळे, ही जोडपी कुटुंबापासून वेगळी राहिल्यानंतर घर आणि बाहेरची जबाबदार यांचे संतुलन राखू न शकल्याने वारंवार त्यांच्यात खडके उडायला लागतात. सततचा वाद इतका विकोपाला जातो की, वैवाहिक नात्यातली ही घुसमट दोघांच्याही व्यक्तिमत्त्वावर आणि शारीरावर दुष्परिणाम करते आणि घटस्फोट हाच एकमात्र पर्याय शिल्लक राहतो. याशिवाय, अनेकदा प्रेमसंबंध असताना सुद्धा आई-वडिलांच्या आग्रहाखातर अनेकदा मुलगा किंवा मुलगी लग्न करतात.
मात्र, लग्नानंतर मान्य नसलेल्या आपल्या जोडीदारासोबत राहण्याची त्यांची इच्छा नसते. स्वभावातील भिन्नता आणि त्रासदायक सवयी यामुळे अनेक विजोड जोडप्यांचे सहजीवन अशक्य होते. विवाहिक असूनही ते एकटे असतात. समाजाच्या भीतीने आणि नाईलाज म्हणून त्यांनी विवाहाचा पोकळ डोलारा टिकवून ठेवलेला असतो. अशा विवाहबंधनात राहणाऱ्यांची अक्षरश: घुसमट होत असते. सततच्या होणा-या भांडणामुळे खचून जाऊन ते अखेर घटस्फोटाचा मार्ग स्वीकारतात.
अर्थात, घटस्फोटाचा निर्णय सहजपणे कोणीही घेऊ शकत नाही. कुटुंब मोडणे हे फारच अपवादात्मक उदाहरण वगळता कुणासाठीही ही आनंदाची बाब असूच शकत नाही. उलट त्यामागे अनेक कारणे असतात. आपलं पटू शकत नाही, हे एका टप्प्यावर आल्यावर पती-पत्नीच्या लक्षात येते. सध्याच्या काळातील स्त्री-पुरुषाची बदलती भूमिका, करिअर प्राधान्य, बदलत्या नोक-या व ठिकाणे, अस्थिर व असुरक्षित नोक-या, लैंगिक समस्या या कारणाने निर्माण होणा-या सततच्या मतभेदामुळे विवाहाचे नाते संपविण्याचा विचार केला जातो. त्यामुळे समाधानी वैवाहिक आयुष्य जगणा-या महिलांपेक्षा घटस्फोटी महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अधिक वाढतो.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये तो दुप्पट आहे. अशा महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक पटीने वाढतो. मुळात, महिला आपल्या नात्याबाबत इतक्या गंभीर असतात की, ते संपुष्टात आल्यावर तणाव, दु:ख आणि हृदयविकार वाढविणा-या अनेक मानसिक स्थितीतून जातात. याशिवाय, आयुष्याच्या जोडीदारांपासून कायमचे विभक्त झाल्यामुळे पुरुषांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढतो. पण तो महिलांच्या तुलनेत कमी असतो.
विशेषत: जिथे संयम, आनंद, प्रेम आणि विश्वास असतो, असे विवाह नेहमीच आनंददायी ठरतात. अशा जोडप्यांमध्ये भांडणे होतच नाहीत, असे नाही. पण परस्पर विश्वासाने त्यांच्यावर तोडगा काढला जातो आणि ही जोडपी पुन्हा आनंदी, उत्साही आयुष्य जगू लागतात.
त्याचप्रमाणे, एकमेकांना समजून घेऊन हे नातं ठिकवले पाहिजे. भांडण हे प्रत्येक नात्यांमध्ये होतेच पण, एखाद्या विषयाला किती महत्त्व द्यायचे हे आपणच ठरवले पाहिजे. त्यामुळे, संसारात होणारे वाद टाळता येतील आणि सततच्या वादातून आरोग्यांवर होणारा विपरित परिणामही टाळता येऊ शकतो.
  • घटस्फोट घेण्यापूर्वी काही गोष्टी महत्त्वाच्या
  • » हाताची पाचही बोटं सारखी नसतात. दोन्ही व्यक्ती परस्परांपासून विभिन्न असतात, हे स्वाभाविक आहे. पण, दोघांमधील ही भिन्नता तडजोडीनेच कमी होईल.
  • » दोघांच्या नात्यात कधीही अहंकार येऊ देऊ नका.
  • » कुठलीही व्यक्ती सर्वगुणसंपन्न नसते. त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये गुण-दोष असतातच. पण ते समजून घेतले पाहिजेत.
  • » नात्यात येणा-या दुराव्यावर मात करून वैवाहिक आयुष्य आनंद बनवले पाहिजे.
  • » एकमेकांना समजून घेतल्याने आपल्यातील दोष कमी करता येऊ शकतात.

No comments:

Post a Comment