Tuesday, June 14, 2016

हृदय प्रत्यारोपणाबाबत लोकांमध्ये जागरूकतेची गरज


मुंबईच्या रस्त्यावर दिवसभर धावत असलेली वाहने आणि त्यातून वाट काढत निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी मुंबईकरांची सुरू असलेली लगबग ही नित्याचीच बाब आहे.
hospitalमुंबईच्या रस्त्यावर दिवसभर धावत असलेली वाहने आणि त्यातून वाट काढत निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी मुंबईकरांची सुरू असलेली लगबग ही नित्याचीच बाब आहे. पण, घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारी मुंबईसुद्धा थांबू शकते, याचा अद्भुतपूर्ण अनुभव काही दिवसांपूर्वीच मुंबईकरांना आला.
मुंबईत यकृत आणि मूत्रपिंड यांचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण झाले आहे. मात्र, हृदय प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकतेचा आणि वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने हृदय प्रत्यारोपण मुंबईत कधीच यशस्वी झाले नव्हते.
केईएम रुग्णालयात ब-याच वर्षापूर्वी हृदय प्रत्यारोपणाचा प्रयोग झाला, पण तोही असफल ठरला होता. त्यानंतर तब्बल ४० वर्षानंतर मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून व्यक्तीला नवीन जीवनदान दिले आहे.
वाहतूक पोलिसांचे सहकार्य, डॉक्टरांचे योग्य नियोजन आणि मुंबईकरांचे स्पिरीट यामुळे एकाच आठवडय़ात दोन जणांवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांना नवीन आयुष्य देण्यात आले आहे. हे केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले. त्यामुळे रुग्णाला नवे जीवनदान देणाऱ्या या संपूर्ण टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
‘हृदय’ हे व्यक्तीच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाची प्रक्रिया बंद पडली की व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित असतो. हृदय आहे तर आयुष्य आहे आणि आयुष्यही सुकर तेव्हा होईल जेव्हा तुम्हाला स्वस्थ हृदय मिळेल. अस्वस्थ हृदयामुळे अनेकदा व्यक्ती विविध आजारांच्या शिकार होतात. काही वेळी हाच आजार व्यक्तीला मृत्यूच्या वाटेवर नेतो.
याशिवाय, हृदयविकार झाल्यास एखादी व्यक्ती सतत भीतीच्या छायेत जगत राहते. कधीही काहीही होऊ शकते, असे सतत त्यांना भासत असते. जगभरात एक चतुर्थाश लोकांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकारच आहे. वैद्यकीय क्षेत्रात आता खूप प्रगती झाली असून हृदयविकारासंबंधी आजारावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना, संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यात ‘हृदय प्रत्यारोपण’ ही महत्त्वाची प्रक्रिया आहे.
ज्यामध्ये ‘ब्रेनडेड’ घोषित केलेल्या व्यक्तीचे हृदय गरज असलेल्या व्यक्तीला देऊन त्यांचे प्राण वाचवता येऊ शकते. परंतु, हृदय प्रत्यारोपण करणे ही सामान्य व्यक्तीप्रमाणेच डॉक्टरांसाठीही खूपच अवघड गोष्ट असते. परंतु, फोर्टिस रुग्णालयातील एका रुग्णावर ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पुण्यातील जहांगिरी रुग्णालयातून एका व्यक्तीचे हृदय फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आले.
पुण्याहून नेव्हीच्या विमानामार्फत हे हृदय मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळापासून रुग्णालयापर्यंत २० कि.मी.चे अंतर ‘ग्रीन कॉरिडोर’मुळे अवघ्या १८ मिनिटांत पार करण्यात आले आहे. एका हृदयासाठी मुंबईचा ठोका थांबविण्याची ही पहिलीच वेळ असून केवळ पोलिसांच्या योग्य समन्वयामुळेच हे शक्य झाले. इतकेच नाहीतर या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत आणखीन एकाच तरुणाला ६३ वर्षीय पुरुषांचे हृदय देऊन त्याचेही प्राण वाचवण्यात आले.
संबंधित दात्याच्या नातेवाईकांनी हृदयाबरोबरच यकृत, मूत्रपिंड, दोन्ही डोळे दान करून नवा सामाजिक दृष्टिकोन रूजवला आहे. या एका मृत व्यक्तीच्या अवयवांमुळे अन्य चार जणांना नवे जीवन आणि दोघांना दृष्टी मिळाली आहे. दरम्यान, एकाच आठवडय़ात अशा दोन घटना समोर आल्याने मुंबईकरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.
विशेषत: वैद्यकीय क्षेत्रात आता खूप प्रगती झाल्याने अवयवय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे सहज शक्य झाले आहे. मुंबईत या शस्त्रक्रियेपैकी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला अद्याप यश आलेले नाही. मात्र, त्यासाठी डॉक्टरांनी नव्हेतर रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मुंबईत ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा आहेत. पण ही शस्त्रक्रिया येथे यशस्वी होऊ शकत नाही, असे रुग्णांच्या नातेवाईकांना वाटते.
त्यामुळे, हृदय प्रत्यारोपणासाठी कोणी पुढे येत नाही. या कारणास्तव, अवयव प्रत्यारोपणाबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. पण, त्यासाठी योग्य वेळी हृदय उपलब्ध झाल्यास हे शक्य होईल. मुळात, हृदय प्रत्यारोपणाबाबत रुग्ण जिवंत राहू शकतो, याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
कारण, चेन्नईमध्ये आतापर्यंत ३७ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. यापैकी ८० टक्के रुग्ण सध्या निरोगी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे, हृदय प्रत्यारोपणाला न घाबरता सामोरे गेले पाहिजे. तसेच अवयवदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेणे आता गरजेचे झाले आहे.

No comments:

Post a Comment