Tuesday, June 14, 2016

कौमार्य चाचणी अन् काळीरात्र...

 आरती जाधव

 महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात नववधू कौमार्य परीक्षेत नापास झाल्याचा दुजोरा देत जात पंचायतीच्या आदेशानुसार पती व सासºयाच्या मंडळीने लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. सुरूवातीला कौमार्य चाचणी हा शब्द पचायला वेळ लागला. पण, या घटनेची दाहकता जाणून घेतल्यावर मनाला प्रश्न पडला की, पुरोगामित्वाचा डंका पिटवणाºया महाराष्ट्रात जातपंचायतीचे अजूनही शाबूत असलेले वर्चस्व राज्याला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. राज्यात एका पाठोपाठ एक जात पंचायतींच्या खुरापती कारनामे उघड होत असताना देशात पिढ्यान् पिढ्यांपासून वर्चस्व अबाधित ठेवलेल्या पुरूषी संस्कृतीच्या आडूनच असलेल्या या जात पंचायतीचे बळी स्त्रियाच ठरतात. त्यामुळे नेमके जात पंचायतीचे काम काय असा प्रश्न नकळतं पडतोय. व शेवटी एका ठिकाणी येऊन वाट थांबते ती म्हणजे ‘पुरूषप्रधान संस्कृती’ अजून काय? पुरूषाचे असो किंवा स्त्रीचे दुदैवाने भारतात कौमार्याविषयी किंवा व्यक्तींच्या चारित्र्यासंदर्भात अनेकांना संशय वाटतो. पण, पुरूषमंडळी स्वत:च्या कौमार्याबाबत मोकळेपणाने सांगताना धास्तावतात. असे असताना लहानपणापासून स्वत:चे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करणाºया मुलींच्या कौमार्याबद्दल विचारण्याचा हक्क पुरूषांना कुणी दिला? ही घटना अत्यंत लाजीरवाणी आहे. पुरूष-प्रधान समाज असो किंवा स्त्री-प्रधान...संस्कृती बदलून जर विचारसरणी बदलणार नसेल, तर दुदैवचं म्हणावं लागेल.
लग्न हा प्रत्येक मुला-मुलींच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नाविषयीही अनेकांच्या भन्नाट कल्पना असतात. कोणी कोर्ट मॅरेज करतं, कोणी साध्यासुध्या पद्धतीने विवाह करतात तर कोणी धुमधडाक्यात लग्न करतो. पण, सध्याच्या बदलत्या युगात नव्या जोडप्यांना रूढी, परंपरा व विधी नकोशा झालेल्या आहेत. मात्र, तरीही कुटुंबातील वडिलधाºया मंडळींच्या आदराखातर सर्व विधी करून रितसर विवाह करतात. लग्नाच्या विधीपर्यंत ठीक आहे. मात्र, महाराष्ट्रात आजही काही भागात लग्नानंतरच्या विधीही पाळल्या जातात, हे नाशिकच्या घटनेवरून समोर आले आहे. आपल्या समाजात लग्नाआधी मुलीचे कौमार्य अबाधित राहिले पाहिजे यावर फार मोठा भर दिला जातो. एखाद्या मुलीने किंवा मुलाने एकदाही लैंगिक संबंध ठेवले नसतील तर तिचे किंवा त्यांचे कौमार्य अबाधित आहे, असे मानले जाते. इतकंच नव्हेतर पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवताना संबंधित स्त्रीच्या योनिमार्गातून रक्त येते. तेव्हाही स्त्री कौमार्य अबाधित आहे, असे समजले जाते. पण नाशिकमध्ये झालेल्या कौमार्य चाचणीत संबंधित मुलीच्या योनिमार्गातून रक्त न आल्याने पंचायतीने तिला या परीक्षेत नापास ठरवले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलींच्या योनिमार्गात एक पडदा असतो. तो पातळ किंवा जाड असू शकतो. हा पडदा लग्नाच्या पहिल्या रात्री लैंगिक संबंधाच्या वेळी फाटतो. व मुलीच्या योनिमार्गातून रक्त येते. अनेक मुलांचा असा समज असतो की, रक्त आले नाहीतर ती व्हर्जिन नाही. पण हे खरं नाही. कारण, पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता. शरीराची आवश्यक तितकी हालचाल होत नसल्याने पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवताना योनीतून रक्त येत असे. पण काल बदलला तशा गरजाही बदलल्या आहेत. बदलत्या युगात स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा देत पुढे जात आहेत. वैद्यकीय क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सामाजिक, पत्रकारिता, खेळ व रिटेल क्षेत्रात स्त्रियांनी स्वत:चे वेगळे विश्व तयार केले आहे. इतकंच नाहीतर आता मुली सायकल चालवतात, धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतात, अशा विविध कारणांनी हा पडदा अनेक मुलींच्या प्रकरणात आधीच फाटलेला असतो. त्यासाठी केवळ लैंगिक संबंधच व्हायला पाहिजेत असं नाही. म्हणून मनातील हा गैरसमज प्रत्येकाने काढून टाकणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. नवरात्रीत नऊ दिवस आपण दुर्गा मातेची पुजा करतो. व उर्वरित ३५६ दिवस समाजातील जाचक परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी स्त्रीचा बळी देतो. ‘‘कौमार्य म्हणजे काय हो...’’स्त्रीच्या कौमार्यबद्दल चर्चा केली जात. स्त्रीयांचे कौमार्य जाणवून घेण्यासाठी लग्नाच्या पहिल्या रात्री चाचणी होते. मग पुरूषांचे काय? पुरूषांसाठी कौमायार्ची परीक्षा कशी घेणार? कसं कळणार की मुलगा व्हर्जिन आहे का नाही? यासंदर्भात भारतातील प्रत्येक नागरिकांनी विचार करायला हवा.
गावखेड्यातील जातपंचायतीने दिलेला निर्णय सर्वश्रेष्ठ मानून नागरिक त्यानुसार वागतात. यामुळेच अनिष्ठ प्रथा समाजात आपले पाय रोवू लागले आहेत. त्यामुळे कुठेतरी हे प्रकार थांबणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला संताची भूमी म्हणून संबोधले जाते. या महाराष्ट्राने समाजाला जोडून ठेवण्याचे कार्य केले आहे. पण जातपंचायतींमुळे समाजात बहिष्काराच्या घटना वाढत आहेत. एकाच आडगावाच्या मुलाशी लग्न केल्याने काही महिन्यांपूर्वीच नवरा व नवरीच्या कुटुंबियांना समाजाने वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला होता. सारख्या आडगावांच्या व्यक्तींच्या विवाहामुळे देवाचा कोप होतो. गावावर संकट येते, अशा नसत्या समजुती हे या जातपंचायतींच्या व गावकीच्या वाळीत टाकण्याच्या आदेशाचे मूळ कारण आहे. केवळ बहिष्कार टाकले असे नव्हेतर अनेक कुटुंबाचा निर्दयापणे छळ केल्याच्याही अनेक घटना आहेत. बारामतीमध्ये महिलांची विवस्त्र विटंबना करण्याची जी घटना घडली होती तो आदेशही जातपंचायतीचाच होता. या कारणास्तव जातपंचायतीला आळा घालण्यासाठी सरकारने नवा कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला. आजवर कायदाच अस्तित्वात नव्हता असे नाही. कायदा याआधीही होताच, पण तरीही जातपंचायतीचे लोक कायदा धाब्यावर बसवून एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय देत आहेत. मात्र, कठोर तरतुदी असलेल्या नवीन कायदा झाला म्हणजे एका रात्रीत जातपंचायतींना आळा बसेल असे नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाला करावी लागेल. महत्त्वाचं म्हणजे खेड्यापाड्यात पोलीस यंत्रणेला जागरूक राहून हे काम करावे लागेल. तरंच जात पंचायतींना लगाम बसवून हा नवा कायदा ‘बहिष्कारा’ लाच वाळीत टाकण्याचे काम करील, अशी आशा करूया!

No comments:

Post a Comment