Tuesday, June 14, 2016

चष्मा दोष गेला ‘विवाहयोग जुळून आला’


चष्मा असल्यामुळे कोणीही लग्न करण्यास होकार देत नसल्याने अनेक मुलींची लग्नं रखडली होती. 
chachmaमुंबई- चष्मा असल्यामुळे कोणीही लग्न करण्यास होकार देत नसल्याने अनेक मुलींची लग्नं रखडली होती.  चष्म्यामुळे अशा प्रकारच्या समस्या अनेकांना नेहमीच भेडसावत असतात. पण आता या लोकांसाठी जे. जे. रुग्णालय आशेचे किरण ठरू लागले आहे. कारण, रुग्णालयात ‘लेझर किरणां’द्वारे रुग्णाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या अत्याधुनिक शस्त्रक्रियेमुळे चष्म्यापासून मुक्ती मिळत आहे.
मागील पाच वर्षात ५,२०० रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची चष्म्याच्या त्रासातून कायमची सुटका झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर लग्नासाठी उत्सुक असणा-या तीन हजार मुलींना त्यांच्या मनाप्रमाणेच जोडीदाराची साथ लाभली आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
लग्न जुळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असते. विशेषत: मुलीच्या लग्नाच्या वेळी अतिशय बारीकसारीक गोष्टीसुद्धा तपासून पाहिल्या जातात. जसे, मुलीला स्वयंपाक येतो का? ती पायाने अधू तर नाही ना? बोलता येतं का? कोणत्याही प्रकारचा आजार नाही ना? या सर्व गोष्टींची मुलाकडची मंडळी खातरजमा करून घेतात. त्यात जर मुलीला चष्मा लागला असेल तर अनेकदा दोघांची पत्रिका जुळूनही लग्नाला नकार दिला जातो.
चष्मा असल्याने कुणीही पटकन लग्नास तयार होत नसल्याने अनेक मुलींची लग्नं रखडलेली आहेत. याशिवाय चष्मा लागलेल्या व्यक्तींना चष्माशिवाय सर्व गोष्टी अंधूक अंधूक दिसतात. एखाद्या वेळी चष्मा कधी चुकून विसरल्यावर किंवा फुटल्यावर नवा चष्मा तयार होईपर्यंत होणारा खोळंबा हा देखील मनस्ताप देणारा ठरतो. पण, या रुग्णांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन दृष्टी देण्यात जे. जे. रुग्णालयाला यश प्राप्त झाले आहे.
सध्या तरुण वयातही चष्मा लागण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वय कितीही असो, लेझर किरणांद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया अत्यंत सोपी असून फक्त पाच मिनिटांच्या शस्त्रक्रियेने रुग्णांना आयुष्यभर चष्मा लावण्याची वेळ येत नाही, अशी माहिती जे.जे. रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. शशी कपूर यांनी दिली.
या रुग्णालयात आठवडय़ात २० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी डॉ. कपूर मासिक दीड हजार रुपये नाममात्र वेतन घेतात. मुंबईतील या सेवेचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून रुग्ण येतात. मात्र, जितक्या मोठय़ा संख्येने रुग्ण येणे अपेक्षित आहेत. तेवढी येत नसल्याची खंतही डॉ. कपूर यांनी व्यक्त केली आहे. कारण, रुग्णालयात अशाप्रकारची शस्त्रक्रिया कमी खर्चात करण्यात येते, यासंदर्भात बहुतांश लोकांना माहितीच नाही. त्यामुळे, अनेक जण डोळ्याच्या शस्त्रक्रियेपासून वंचित राहिलेले आहेत.
या कारणास्तव डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे भविष्यात कधीच चष्मा वापरण्याची गरज पडणार नाही, याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मतही डॉ. कपूर यांनी व्यक्त केले.
चष्मा का लागतो?
ज्या व्यक्तीला चष्मा लागतो, त्या व्यक्तीच्या डोळ्याच्या रेटिनावर एक थर जमा झालेला असतो. त्या थरामुळेच त्याला चष्मा लावण्याची वेळ येते. मात्र, लेझर किरणांद्वारे करण्यात येणा-या शस्त्रक्रियेमुळे रेटिनावर जमा झालेला थर काढून टाकण्यात येतो. या प्रक्रियेमुळे रुग्ण चष्मा न लावताही स्पष्टपणे पाहू शकतो.
रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वी या रुग्णाची फक्त एकदा संपूर्ण शारीरिक व डोळ्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेची तारीख दिली जाते. प्रत्यक्ष दोन्ही डोळय़ांच्या शस्त्रक्रियेला पाच ते दहा मिनिटांहून जास्त काळ लागत नाही. त्यानंतर लगेचच रुग्णाला घरी सोडण्यात येते. एखाद्याच्या चष्म्याचा नंबर जास्त असल्यास त्याला शस्त्रक्रियेनंतरही स्पष्ट दिसू शकते. मात्र, वाचन करताना चष्मा लावणे बंधनकारक असते.
खासगीपेक्षा सरकारी रुग्णालयात स्वस्तात शस्त्रक्रिया
डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणारी ही मशीन जे. जे. रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही मशीन अमेरिका किंवा जर्मनीहून आयात करावी लागत असून या मशीनची किंमत तीन कोटी रुपये आहे. देशभरात आता ५०० मशिन्स विविध रुग्णालयांत उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
मात्र, या सर्व मशीन खासगी रुग्णालयात असल्याने सर्वसामान्य रुग्णांना त्याचा खर्च परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे, स्वस्त दरात रुग्णांवर उपचार करता यावे, यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सरकारला विनंती करून ही मशीन जे. जे. रुग्णालयात आणली. रुग्णालयात आता फक्त दहा हजार रुपयात ही शस्त्रक्रिया केली जाते. रुग्ण जर केशरी रेशन कार्डधारक असला तर त्याला या फिमध्येही आणखी सवलत दिली जाते.
लग्न जुळण्यास येत होत्या अडचणी
चष्म्याचा नंबर १० असल्याने मोठा चष्मा वापरावा लागत होता. मोठा चष्मा असल्याने बघण्यासाठी येणारी मंडळी लग्नाला नकार देत होती. चार मुलांनी फक्त चष्मा असल्यामुळे नकार दिला होता. याशिवाय लेन्स लावल्यामुळे वारंवार डोळ्याला इन्फेक्शन व्हायचे. त्यामुळे, कुटुंबातील सर्व जण अत्यंत चिंतेत होते. जे. जे. रुग्णालयात लेझर किरणांद्वारे डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे कळले. डॉक्टरांनीसुद्धा या शस्त्रक्रियेमुळे डोळ्यांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे समजावून सांगितले. डॉक्टरांवर विश्वास ठेवून ऑक्टोबर २०१४ रोजी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे आता मी चष्मा न लावताही स्पष्ट पाहू शकते. त्यानंतर फेब्रुवारी २०१५ला माझे लग्न झाले.
- राधिका मुखर्जी, रुग्ण

No comments:

Post a Comment