आरती जाधव
रस्त्यावर थुंकण्यास राज्य
सरकारने बंदी घातली असतानाही अजूनही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार
उघडपणे सुरूच आहेत. रस्त्यावर पान व तंबाखू खाऊन थुंकणा-यांवर आळा
घालण्यासाठी सरकारने थुंकणे प्रतिबंधक कायद्याचा नवा मसुदा तयार केला आहे.
पुढील पावसाळी अधिवेशनात हा प्रस्ताव
मांडून याचे कायद्यात रूपांतर करण्यात येईल. या कायद्याच्या अंमलबजावणीचा
अधिकार पोलीस व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार असल्याचे
राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पण, ही अंमलबजावणी योग्यरित्या
होईल का, हा संशोधनाचा भाग आहे.
रस्त्यावर थुंकल्याने ती जागा अस्वच्छ
होते. त्याचसोबतच क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रसारही होतो.
झोपडपट्टय़ांमध्ये संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते.
त्यामुळे, थुंकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण, तरीही
काही ठिकाणी पान व तंबाखू खाऊन थुंकणे सुरूच आहे.
सरकारने रस्त्यावर थुंकणा-यांविरोधात
दंडही आकारला. मात्र, दंड भरल्यानंतर पुन्हा थुंकणे सुरूच राहते. हे पाहता
यावर कसे प्रतिबंध घातला येतील याकरिता सोशल नेटवर्किंग साईटवरून
सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. या नागरिकांना
दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये दंडात्मक कारवाईव्यतिरिक्त थुंकलेली जागा साफ
करण्याची शिक्षा करण्यात यावी.
जेणेकरून थुंकणा-यालासुद्धा अवघडल्यासारखे
होईल व पुढच्या वेळी ती व्यक्ती असे करणार नाही. या सूचनांचा विचार करून
हे कायद्यात बसवण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेषत:
समाजसेवी शिक्षा हे कायद्याच्या कचाटय़ात बसणारे नाही. त्यामुळे, यासंदर्भात
मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर हा
प्रस्ताव विधिमंडळात सादर होणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वीच सरकारच्या
आदेशानुसार शहरातील विविध परिसरात रस्त्यांवर, उद्यानात, इमारतीच्या
शेजारी, मॉल आणि शाळेच्या आवारात ‘येथे थुंकू नका’ असे संदेशाचे फलक
लावलेले आहेत. पण ज्या ठिकाणी संदेशाच्या पाटय़ा लिहिल्या आहेत त्या ठिकाणीच
थुंकून ठेवण्याचे प्रकार दिसून येतात.
पान व तंबाखू खाऊन थुंकणा-या व्यक्ती
मोकळ्या जागी तर थुंकतातच, शिवाय इमारती व रुग्णालयांच्या जिन्यांमध्ये
थुंकणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी दंडाची धमकी किंवा
कारवाईचा इशारा दिला असला तरी या उपाययोजना राबविण्यासाठी यावर सातत्याने
लक्ष ठेवणार कोण? या मर्यादेमुळे थुंकीबहाद्दरांवर फारशी कारवाई झाली नाही व
अद्यापही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सुरूच आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजपा सरकारने
तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली होती. पण हे पदार्थ बाजारात,
गल्लीबोळात, नाक्यावर उघडपणे विकले जात आहेत. यावर सरकारचे कोणतेही निर्बंध
नाहीत. लोकही या वस्तू विकत घेऊन याचे सेवन करत आहेत.
शाळा परिसरात १०० यार्डात तंबाखूचे पदार्थ
विकू नयेत व १८ वर्षाखालील मुलांना याची विक्री करू नये असा नियम आहे.
मात्र, सरकारच्या या नियमांना धाब्यावर बसवत तंबाखूच्या खरेदी-विक्रीचे
प्रकार सुरू आहेत. लहान वयात मुले व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहेत. या
कारणास्तव सध्या राज्यात तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढताना दिसून येत
आहेत. याचे एकमेव कारण तंबाखूजन्य पदार्थाचे अतिरिक्त सेवन हेच आहे.
तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो किंवा
या पदार्थाचे सेवन करून रस्त्यावर थुंकल्याने जंतूंचा संसर्ग होऊन अन्य
नागरिकांनाही विविध व्याधी होऊ शकतात. त्यामुळे ‘तंबाखू खाणे टाळा व आरोग्य
सुदृढ बनावा’ अशा आशयाचे फलक जागोजागी लावून याबाबत लोकांमध्ये जागरूकता
निर्माण करण्यात येत आहे.
मात्र, याकडे दुर्लक्ष करत सुशिक्षित
नागरिकही तंबाखू, सिगारेट, पान व विडीचे सेवन करतात. सतत तंबाखूचे सेवन
केल्याने या व्यक्ती हळूहळू मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. त्यावर आता
प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने तंबाखू पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालून
काहीच होणारे नसून उत्पादनावर बंदी घातली पाहिजे.
जेणेकरून या हानिकारक पदार्थाचे सेवन बंद
होईल व रस्त्यावर पान व तंबाखू खाऊन थुंकण्याचे प्रकारही आपोआप थांबतील. पण
उत्पादन बंदीसंदर्भात कोणतेही पाऊल न उचलता आता रस्त्यावर थुंकणा-याला दंड
म्हणून सफाई करावी लागणार आहे.
सरकारच्या या नियमांचे उल्लंघन करणा-यांना
दंडात्मक कारवाईत पोलीस, वाहतूक पोलिसांना समाविष्ट केले जाईल. रस्त्यावर
थुंकणा-यांवर वाहतूक पोलीस, सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर पोलीस कारवाई
करतील. रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये यासाठी एक विशेष अधिकारी
नेमण्यात येणार आहे. नागरिकही एखाद्याची थुंकण्याची तक्रार करू शकणार आहेत.
मात्र, उघडय़ावर थुंकण्यासंदर्भात तयार केलेला राज्य सरकारचा हा नवा
फॉर्म्युला किती चालणार हेच पाहावं लागेल.
No comments:
Post a Comment