आरती जाधव
दात
काढण्यानंतर दृष्टी कमी होते, क्लिनिंगची प्रक्रिया केली तर दात खिळखिळीत
होतात, दात साफ केले तर ते झिजतात, अशा अनेक गैरसमजुतीचा पगडा लोकांमध्ये
पाहायला मिळत होता. मात्र, एखादा दात किडल्यावर त्याला मुळासकट काढून
टाकण्याची गरज नसते.
सध्या ८० टक्के लोक किडलेल्या दातांवर
उपचार करून दात वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तर अद्यापही
काही लोकांमध्ये दाताचा कर्करोग होऊ शकतो, अशी गैरसमजुतीची भावना मनात घर
करू लागली आहे. विशेषत: दाताचा कर्करोग होतो पण त्यामागील कारणे वेगळी
आहेत, हे सांगणारा हा लेख..
‘‘बाकी कुठलंही दुखणं चालेल, पण दातांचं
दुखणं नको..’’असे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. त्यामुळे, दात दुखू
लागल्यावर डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून अनेक जण घरगुती उपाय
म्हणून दातावर मीठ चोळतात. मात्र, तरीही दुखणं कमी न झाल्यावर रुग्ण
दंतचिकित्सकाकडे जातो. या दाताच्या दुखण्यावर उपचार करावा लागले, असा सल्ला
डॉक्टरांनी दिल्यानंतर रुग्ण उपचारास नकार देतो. व दात काढून टाका असा जणू
तगादा डॉक्टरकडे लावतो. मात्र, अचानक होणारी दंत वेदना किंवा दाताच्या
भोवती झालेली जखम ही दात किडल्यामुळेच झालेली आहे, असे नसते.
कारण, अनेकदा गरम किंवा थंड पाणी
प्यायल्यावर दात दुखतो. हे दुखणे केवळ संवेदनशीलता असून ते औषधांनी बरे होऊ
शकते. मात्र, दाताला किड लागणे, दातामध्ये पू भरणे, हिरडय़ाला सूज येणे व
त्यातून रक्तस्त्राव होत असल्यास त्यावर उपचाराशिवाय पर्याय नसतो. वेळेत व
योग्य उपचार न केल्यास दातांमध्ये पोकळी निर्माण होते. आणि त्यात अन्नकण
अडकून तीव्र संसर्ग निर्माण होतो. त्याच्या गंभीर वेदना रुग्णाला सहन
कराव्या लागतात. त्यामुळे गालाच्या आतून व बाहेरून सूज येते.
दात व हिरडय़ाच्या दरम्यान निर्माण होणा-या
जागेतही जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. हा संसर्ग अन्य दातांच्या
मुळाशी जातो. त्यामुळे वेळेवर यावर उपचार न केल्यास हा संसर्ग शरीराच्या
अन्य भागातही पसरू शकतो. या कारणास्तव मोठय़ा प्रमाणात दातांचे नुकसान सहन
करावे लागते. या कारणास्तव वेळीच उपचार केल्यास त्रास तर कमी होतोच शिवाय
तो दातही वाचवता येतो. त्यामुळे दातासंदर्भात लोकांमध्ये असलेले समज-गैरसमज
दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. या कारणास्तव दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन हे
सर्व समजून घेणे महत्त्वाचे आहे.
शहराच्या तुलनेच ग्रामीण भागात दातांच्या
बाबतीतला सर्वात मोठा गैरसमज कुठला असेल तर तो दात काढण्यानंतर दृष्टी कमी
होते. परंतु, तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दात काढल्यावर दृष्टी कमी
होत नाही. याला वैद्यकीय क्षेत्रात काही शास्त्रीय कारणे आहेत. दाताला व
डोळ्याला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी व संवेदनांचे ज्ञान असणारी चेतातंतू
किंवा नसा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दात काढल्यानंतर डोळ्यावर परिणाम
होण्याची शक्यता नसते. हा गैरसमज पसरायला काही कारणे आहेत.
ब-याचदा दाताची समस्या चाळिसीच्या नंतर
पाहायला मिळते. त्यातच दातासंदर्भात आपल्या मनात असलेल्या गैरसमजुतीमुळे
डोळ्यांच्या डॉक्टरांकडे डोळे तपासणीसाठी जातो. या चाळिशीत अन्य
अवयवांप्रमाणे डोळ्याची दृष्टी सुद्धा अंधुद झालेली असते. अशावेळी डॉक्टर
चष्मा लावण्याचा सल्ला देतात. दात काढल्यामुळे दृष्टी कमी झाल्याचे लोक
मानतात. परंतु, शास्त्रीयदृष्टय़ा हे अजिबात तथ्य नाही.
याशिवाय दात साफ केल्यानंतर ते पडतील, अशी
शंका लोकांच्या मनात असते. पण, तसेही काही नाही. कारण, दात साफ केल्यानंतर
दात व हिरडय़ा यांच्यात एकप्रकारची जागा तयार होते. त्यामुळे काही काळ दात
आपल्याला हलल्यासारखे वाटू लागतात. परंतु, ते केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे
असते. काही तासात ही जागा भरून दात व हिरडय़ा एकमेकांना घट्ट चिकटतात.
त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
उलट वर्षातून एकदा तरी दाताच्या डॉक्टरकडे
जाऊन संपूर्ण दात साफ करून घेतल्यास दातांचे आयुष्य वाढते. इतकेच नाहीतर
एखादा दात खराब असेल तर वेळीस त्यावर उपचार केल्यास खर्च सुद्धा कमी येतो.
ही गोष्ट मागील काही वर्षात लोकांना पटू लागली आहे. त्यामुळे लोक दंत
आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ लागली आहेत.
मात्र, दाताची काळजी न घेतल्यास कर्करोग होण्याची शक्यता आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर म्हणजे दाताचा कर्करोग होतो पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे. हल्ली तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. त्याचा संबंध जोडून दातामुळे कर्करोग होतो हा गैरसमज पसरू लागला आहे.
मात्र, दाताची काळजी न घेतल्यास कर्करोग होण्याची शक्यता आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर म्हणजे दाताचा कर्करोग होतो पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे. हल्ली तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. त्याचा संबंध जोडून दातामुळे कर्करोग होतो हा गैरसमज पसरू लागला आहे.
अनेकदा रुग्ण तंबाखू, पान, विडी किंवा
सिगारेट हे दाताच्या बाजूच्या हिरडीत ठेवतात किंवा दाताने ते चिघळत राहतात.
या सर्व पदार्थात कर्करोग होण्याचे घटक जास्त प्रमाणात असतात. ओठांवर,
गालावर, जिभेवर व हिरडय़ावर चट्टे येणे, तोंड पूर्ण उघडता न येणे, तिखट
खाताना त्रास होणे ही कर्करोगाची लक्षणे आहेत. दातांमुळे कर्करोग होण्याची
शक्यता नसते.
मात्र, अनेकदा गाल नकळत चावल्याने किंवा
संपूर्ण दात काढून कवडी बसल्यास ती कवडी गालाला किंवा तोंडाच्या आतील भागात
लागून जखम होते. या जखमेकडे रुग्ण दुर्लक्ष करतो. पण ही जखम अधिक वाढल्यास
कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे, कवडी बसल्यानंतर वारंवार ती
तपासून घेणे, तोंडात खाताना किंवा चावताना ती टोचत असल्यास डॉक्टराकडे
जाऊन त्यावर उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय, लहान मुलांमध्ये दात
किडण्याचे प्रमाण जास्त आहे.
किडलेल्या दातांवर उपचार करणे सहज शक्य
आहे. पण बहुतांश पालक दुधाचे दात असल्याने उपचार न करता ते काढण्यावर अधिक
भर देतात. हे दुधाचे दात काढणे अत्यंत चुकीचे असल्याचे डॉक्टर सांगतात.
कारण, मुलांना दुधाचे दात येण्यामागे काही ठोस कारणे आहेत. हे दात नवीन
येणा-या दातासाठी जागा तयार करत असतात. परंतु, हे दात काढल्याने ती मोकळी
जागा भरून येणारे दात वाकडे-तिकडे येतात. त्यामुळे, पालकांनी याची काळजी
घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
- दाताला होणा-या रोगांची कारणे
- दूध, दही व मासे यांचे अतिप्रमाणात सेवन
- कठीण वस्तू दाताने तोडण्याचा प्रयत्न करणे
- जास्त प्रमाणात चॉकलेट व गोड पदार्थ खाणे
- तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असणे
No comments:
Post a Comment