Tuesday, June 14, 2016

‘मूत्रपिंड’दानासाठी मृतांच्या नातेवाइकांकडून मिळतो नकार


ब-याच वर्षापासून अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजू रुग्णांना अवयवदानामुळे नव्याने आयुष्य जगण्यासाठी आशेचा किरण मिळू शकतो. 
kidneyमुंबई - ब-याच वर्षापासून अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजू रुग्णांना अवयवदानामुळे नव्याने आयुष्य जगण्यासाठी आशेचा किरण मिळू शकतो. मागील वर्षापासून मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांच्या परवानगीनंतर हृदय, फुप्फुस, डोळे यांचे दान करून अनेकांचे प्राण वाचवण्यात आले.
पण मूत्रपिंड दान करण्याचा विषय याला अपवाद ठरत आहे. कारण, मृत व्यक्तीचे मूत्रपिंड दान करण्यास डॉक्टर नातेवाइकांची परवानगी मागतात. त्यावेळी मूत्रपिंड वगळता अन्य अवयव दान करा, असे सांगण्यात येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे, देशात वर्षाला फक्त ३०० तर मुंबईत सुमारे ७० मृत व्यक्तींकडून मूत्रपिंडदान होत असल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे. यावरून दात्यांच्या तुलनेत गरजूंची संख्या अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.
देशात दरवर्षी साडेतीन लाख रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. २०१४-१५ या दोन वर्षात मृत व्यक्तींच्या अवयवदानामुळे ३०० व्यक्तींना मूत्रपिंड प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. तर मुंबईत तीन हजार लोक सध्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे अवयव दान केल्यानंतर मुंबईत फक्त ७० प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समितीने दिली. तर राज्यात २०१४ मध्ये ७५४ जणांवर तर २०१५ मध्ये ५६० जणांवर यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. पण दात्यांच्या तुलनेत प्रतीक्षा यादीवर असणा-या लोकांची संख्या अधिक आहे. यावरून मूत्रपिंड दान करण्यासंदर्भात लोकांमध्ये अद्यापही पाहिजे तितकी जागरूकता नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
बदलती जीवनशैली व उघडय़ावरील मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असल्याने सध्या मूत्रपिंड विकाराचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे या आजारासंदर्भात समाजातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत मूत्रपिंड तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 ‘केईएम’मध्ये ८०० रुपयांत डायलिसिस 
मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असते. पण बहुतांश लोक डायलिसिसवर अवलंबून राहतात. आठवडय़ातून तीन दिवस डायलिसिस करावे लागते. सरकारने डायलिसिसचा खर्च दोन हजार ठरवून दिला असला तरी केईएममध्ये डायलिसिसचा खर्च ८०० रुपयेच आहे. या रुग्णालयात दररोज ५०-६० रुग्णांवर डायलिसिस करण्यात येते. डायलिसिस हा प्रथमोपचार असून प्रत्यारोपण करावेच लागते.
- डॉ. निवृत्ती हासे, प्रमुख मूत्रपिंड विभाग, केईएम रुग्णालय
आजार टाळण्यासाठी हे करा?
» नियमित पाणी प्या.
» रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
» आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सकस आहार घ्या.
» वर्षातून एकदा मूत्रपिंडाची तपासणी करून घ्या.
» वेदनारहित गोळ्या घेणे टाळा.
» आयुर्वेदिक, होमियोपॅथी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
 मूत्रपिंडाचे कार्य
मानवी शरीरात दोन ‘मूत्रपिंडे’ असतात. रक्तातील अनावश्यक घटक गाळण्याची क्रिया मूत्रपिंड करीत असते. मूत्रपिंड हा अवयव शरीरातील रक्ताची प्रक्रिया नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. जन्मापासून वयाच्या ३० वर्षापर्यंत मूत्रपिंडाचे कार्य हे सामान्यपणे चालू असते. नैसर्गिकरित्या वयोमानाप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे केस पांढरे होतात. त्याचप्रमाणे मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होत जाते. वयाच्या तिशीनंतर प्रत्येक १० वर्षानी मूत्रपिंडाची कार्यक्षमता ही हळूहळू कमी होत जाते.
 सर्व जिल्ह्यांत दोन हजार डायलिसिस केंद्र
मूत्रपिंडाचा विकार असणा-या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. भारतात ४,९५० तर मुंबईत फक्त १०० डायलिसिस केंद्रं रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. पण रुग्णांच्या तुलनेत ‘डायलिसिस’ केंद्रं अपुरी पडत आहेत. या रुग्णांना दिवसाआड डायलिसिस करावे लागते. ग्रामीण भागात व खेडय़ापाडय़ात ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचाराकरिता मुंबई, पुणे किंवा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. पण डायलिसिसचा खर्च परवडण्याजोगा नसल्याने गरीब रुग्ण औषधोपचारांवरच जगत राहतात. या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांनाही डायलिसिस सुविधा मिळावी म्हणून ‘राष्ट्रीय डायलिसिस सेवा’ कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यात एकूण दोन हजार डायलिसिस केंद्रं सुरू होणार आहेत.
मूत्रपिंडाची कार्यक्षमता किती?
भारतीयांच्या रचनेप्रमाणे मूत्रपिंडाच्या गाळण प्रक्रियेची क्षमता ही ९० ते ११० मिली-प्रति मिनिट इतकी आहे. तिशीनंतर प्रत्येक १० वर्षानी म्हणजेच १० मिली-प्रति मिनिट गाळण करण्याची क्षमता कमी होत आहे.
मधुमेह रुग्णांना ‘मूत्रपिंडा’चा धोका 
मधुमेह व उच्च रक्तदाब या आजाराने सध्या बहुतांश लोक त्रस्त आहेत. पण यावर नियंत्रण न ठेवल्यास आजार वाढून मूत्रपिंडाला धोका निर्माण होऊ शकतो. सध्याच्या धावपळीच्या युगात तेलकट पदार्थ खाणे, सोडायुक्त शीतपेये पिणे, जेवण्याच्या व झोपेच्या अनिश्चित वेळा यामुळेही मूत्रपिंडाचा त्रास होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे देशभरातील मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले ६० टक्के रुग्ण हे मधुमेह या विकाराने पछाडलेले असतात.
कारण, मूत्रपिंडाजवळील लहान-मोठय़ा रक्तवाहिन्या निकामी होतात. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, स्थूलपणा, प्रतिकारशक्ती कमी असणे, मूत्रपिंडातील संसर्ग, मूत्रपिंडाचे काही कौटुंबिक आजारही याला कारणीभूत ठरतात, असे मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप घाडगे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment