Tuesday, June 14, 2016

हातभट्टी दारू विक्रीला पोलिसांचे अभय

व्यसनमुक्तीबाबत विविध स्तरावर जनजागृती करण्यात येत असताना अनेक ठिकाणी सर्रासपणे दारूचे सेवन करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात अशाप्रकारच्या दोन घटना समोर आल्या आहेत.
drinkव्यसनमुक्तीबाबत विविध स्तरावर जनजागृती करण्यात येत असताना अनेक ठिकाणी सर्रासपणे दारूचे सेवन करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात अशाप्रकारच्या दोन घटना समोर आल्या आहेत. जान्हवी गडकरी या वकील तरुणीने दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेतला. त्यानंतर वांद्रेमधील एका महिलेने मद्यपान करून पोलिसांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय बॉलिवूड अभिनेता सलमान खानने काही वर्षापूर्वी दारूच्या नशने गाडी चालवून मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तींचा बळी घेतला.  हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. या घटना जगातील उच्चभ्रू जगाचे दर्शन घडवत असले तरी मुंबईतील मालाड-मालवण भागात एक असे जग आहे, जे झोपडपट्टय़ांमधून चाळीत आणि अनधिकृत इमारतींपासून दहा बाय दहाच्या खोल्यांपर्यंत विस्तारलेले आहे. परंतु, हा भाग उच्चभ्रूवर्गीय लोकांच्या तुलनेत नेहमीच वंचित राहिलेला आहे. दोन दिवसांपूर्वी याच भागात विषारी दारू पिऊन बळी पडलेल्या सर्वसामान्य व्यक्ती या जगाचाच एक भाग आहे.
मुळात विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची ही पहिला घटना नाही. परंतु, या घटनेतील मृतांचा आकडा हा थक्क करणारा असल्याने पोलीस प्रशासनासह सरकारी यंत्रणांनाही जागे व्हावे लागले. मात्र आज मुंबईसारख्या ठिकाणी हातभट्टी दारूची विक्री होते, याचाच अर्थ  याला पोलिसांचेच अभय, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
मालवणी भागातील लक्ष्मीनगर परिसरात बिगारी कामगार, रोजंदारी कामगार आणि मजूर राहतात. दिवसभराच्या कामातून मिळालेल्या पैशातूनच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे कुटुंबातील कमवती व्यक्ती या दुर्घटनेत गमावल्याने आता कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.
दरम्यान, सरकारी दरबारी अद्यापही उदासीनता असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण, सरकारी नियम आणि कायदा तयार करत असताना गरीब आणि श्रीमंत असा भेद केला जातो. त्यामुळे श्रीमंतासाठी ज्या गोष्टी सुलभपणे प्राप्त होतात. त्या मिळविण्यासाठी गरिबांवर मात्र, कायद्याची बंदी असते. दारूचेही अगदी तसेच आहे. सरकार एकीकडे दारू बंदीसंदर्भात राज्यभरात जनजागृतीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करते. त्याच दारू विक्रेत्यांना सर्रासपणे दारूची विक्री करण्यासाठी परवाने वाटत सुटले आहेत.
विषारी दारूचे बळी हे व्यसनाधीनतेचे बळी असतात, त्याचबरोबरीने ते पोलिसांच्या निष्काळजीपणाचे, हप्तेखोरीचे आणि गरिबीचेही बळी असतात, हे समाजातील खरेखुरे वास्तव आहे. इतकेच नाहीतर एखाद्या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करून आपले कर्तव्य संपले, असे सरकारला वाटते.
परंतु, या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देऊन त्यांनी गमावलेली व्यक्ती परत आणू शकत नाही. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेत बदल करून गरिबांना समोर ठेवून आवश्यक ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मालाड-मालवणी भागात झालेल्या विषबाधेच्या दुर्घटनेनंतर तेथून अवैध दारूविक्रीचे प्रकार उघडकीस आले आहे. परंतु, या दारूविक्रीबाबत तेथील स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती, असा दावा करणे मूर्खपणाचे होईल. त्यामुळे संबंधित पोलीस अधिका-यांचे केवळ निलंबन करून भागणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
तरच हा प्रश्न सुटले, नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्याच..कारण फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यभरातील विविध कानाकोप-यात खुलेआम हातभट्टय़ा सुरू आहेत. पोलिसांनाही यांची पूर्णत: कल्पना आहे. परंतु, कोणीही याबाबत कारवाई करताना दिसत नाही.
मालवणी परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. मात्र, याकडे प्रशासन पूर्णत: लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे जर मालवणीऐवजी एखाद्या उच्चभ्रू वस्तीत किंवा बारमध्ये ही घटना घडली असती तर याच गोष्टीचा मोठा गजाबाजा झाला असता. पण, मालवणी भागातील लक्ष्मीनगर झोपडपट्टीत ही घटना घडल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
परंतु, मृतांचा वाढता आकडा पाहता पोलिसांना यात लक्ष घालावे लागले. इतकेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, ही घटना पुन्हा उद्भवू नये म्हणून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सरकार गरिबांच्या बाबतीत गंभीर नसून घटना कुठलीही असो, जबाबदार कोणीही असो, बळी गरिबांचाच जातो हे या घटनेनंतर पुन्हा अधोरेखित झाले आहे.

No comments:

Post a Comment