आरती जाधव
सरकारी रक्तपेढीतील रक्ताची किंमत २०० रुपयांची कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
| Add caption |
सरकारी
रक्तपेढीतील रक्ताची किंमत २०० रुपयांची कमी करण्याचा निर्णय आरोग्य
विभागाने घेतला आहे. रक्ताच्या दरात दुपटीपेक्षा अधिक वाढ केल्याने
सर्वसामान्य रुग्णांची होत असलेली अवस्था लक्षात घेऊन सरकारी रक्तपेढयांतील
एका रक्ताच्या पिशवीचा दर १०५० वरून ८५० रुपये करण्यात आला आहे. परंतु
गेल्या वर्षी आरोग्य विभागाने खासगी रक्तपेढयांचे दर १४५० निश्चित
केल्यानंतरही काही ठिकाणी यापेक्षा अधिक दर आकारले जात असल्याचे समोर आले
आहे. मात्र सरकारी रक्तपेढयांचे दर आरोग्य विभागाने कमी केलेले असताना
खासगी रक्तपेढयांचे दर मात्र ‘जैसे थे’ ठेवल्याने सर्वसामान्य
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या
प्रस्तावानुसार जून २०१४ मध्ये सरकारी आणि खासगी रक्तपेढयांतून पुरविण्यात
येणा-या रक्त पिशवीचा दर १०५० रुपये इतका दुप्पट करण्यात आला होता. राज्यात
एकूण ३१० सरकारी रक्तपेढया आहेत. यामध्ये २०६ खासगी रक्तपेढया आहेत.
प्रामुख्याने मोठया रुग्णालयात खासगी
रक्तपेढयांमधून वाढीव दर आकारण्यात येत आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. ही लुटमार थांबवण्याची मागणी नागपूरमधील
हिवाळी अधिवेशात करण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी बैठक घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने नेमके
किती दर असावेत हे ठरविण्यात आले.
त्यानुसार अधिवेशनात सार्वजनिक आरोग्य
मंत्र्यांनी सरकारी तसेच केंद्रीय एड्स नियंत्रण विभागातर्फे अर्थसाह्य होत
असलेल्या रक्तपेढयांतील रक्ताचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, खासगी रक्तपेढयांच्या दरवाढीला चाप लावताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक
सावंत यांनी सरकारी रक्तपेढयांचे वाढवलेले दर रद्द करून कमी करण्यात
आल्याचे सांगितले.
खासगी रक्तपेढीचे दर चढतेच!
सरकारी रक्तपेढीचे दर २०० रुपयांनी कमी
केले असले तरी खासगी रक्तपेढींचे दर मात्र चढतेच असल्याचे दिसून येत आहेत.
कारण, गेल्या वर्षी खासगी रक्तपेढयांना रक्तासाठी तसेच लाल पेशींसाठी १४५०
रुपये, तर प्लाझ्मा व प्लेटलेट्ससाठी ४०० रुपये आणि क्रायोप्रेसिपिटेटसाठी
२५० रुपये दर आकारण्यात येतील, असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने
(एसबीटीसी) जाहीर केले होते.
दरम्यान, खासगी रक्तपेढयांच्या दरात
आरोग्य विभागाने कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना
जादा पैसे आकारूनच रक्त घ्यावे लागणार आहे. परंतु सरकारने निश्चित
केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारणा-या रक्तपेढयांविरोधात राज्य रक्त
संक्रमण परिषद किंवा अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करा, असे आवाहन
आरोग्य विभागाने केले आहे.
महाराष्ट्र सरकारने सरकारी रक्तपेढीचे दर जून २०१४ला निश्चित केले होते.
मात्र हे दर अजून कमी करता येत असल्याने आम्ही हे दर २००रुपयानी कमी केले
आहेत. मात्र खासगी रक्तपेढयांशी आमची मिटींग झाली. परंतु त्यांनी नकार
दिला. त्यामुळे आम्ही खासगी रक्तपेढयांचे दर कमी न करता केवळ सरकारी
रक्तपेढयांचे दर कमी केले आहेत.- डॉ. सतीश पवार, आरोग्य अधिकारी
No comments:
Post a Comment