Tuesday, June 14, 2016

मधुमेह बिनाआवाजी मृत्युघंटा!


‘टीबी हारेगा, देश जितेगा..’ असे स्वप्न उशारी बाळगून क्षयरोगाचे शून्य उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पण सध्या मधुमेह हा आजार समाजाला पोखरू लागला आहे. बदलत्या जीवनशैलीत अनेकांना जंकफुड, पेप्सी व शीतपेयांचे सेवन करण्याची सवय लागलेली आहे.
DIABETES‘टीबी हारेगा, देश जितेगा..’ असे स्वप्न उशारी बाळगून क्षयरोगाचे शून्य उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पण सध्या मधुमेह हा आजार समाजाला पोखरू लागला आहे. बदलत्या जीवनशैलीत अनेकांना जंकफुड, पेप्सी व शीतपेयांचे सेवन करण्याची सवय लागलेली आहे. पण कोकोकोला, मिरिंडा, लिम्का यांसारख्या सर्व कोल्ड्रिंकमध्ये गूळ व साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे या पेयांचे सेवन केल्याने हानिकारक घटक शरीरात जातात.
पौष्टिक आहार व नियमित व्यायाम नसल्याने शरीराचेही संतुलन बिघडते व मधुमेह होण्याची शक्यता वाढते. ‘इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ रिसर्च’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार २०१४-१५ या वर्षात भारतात सहा कोटी लोकांना मधुमेहाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर हा आजार एकासोबत अनेक आजार घेऊन येत असल्याने या आजारामुळे अनेकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे, हे वास्तव नाकारू शकत नाही.
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ‘जागतिक आरोग्य दिना’च्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्स डॉक्टर्स’ (मार्ड)ने मधुमेहाबाबत केलेल्या सर्वेक्षणात कुटुंबात कोणालाही मधुमेह नसल्यास त्या व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका नसतो, असे मत लोकांनी मांडले. यावरून लोकांमध्ये मधुमेहासंदर्भात चुकीचा समज असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर एड्स, क्षयरोग व कुपोषण यांसारख्या भयावह आजाराला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने ज्या पद्धतीने मोहीम आखली, त्या धर्तीवर आता मधुमेहाचे शून्य उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘राष्ट्रीय मधुमेह नियंत्रण कार्यक्रम’ सुरू करायला पाहिजे. जेणेकरून या आजारासंदर्भात तळागाळातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येईल.
एखाद्या जवळच्या नातलगाला किंवा मित्र-मैत्रिणीला मधुमेह असल्याचे कळताच पटकन सल्ला देण्यासाठी जास्त गोड खाऊ नकोस असे आपसुकच म्हटले जाते. मात्र, ज्या व्यक्तीला गोड आवडत नाही किंवा फार कमी गोड खातो, मग रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असूनही मधुमेह कसा झाला, असा अनेकांचा गैरसमज आहे.
कारण मधुमेह म्हणजे रक्तातले साखरेचे प्रमाण नियंत्रित न राहणे, स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलीन कमी प्रमाणात किंवा कमी प्रभावी असल्याने रक्तात साखरेचे प्रमाण वाढते, त्याचप्रमाणे बराच वेळ काही न खाल्ल्याने, जेवण न केल्याने ते एकदम कमी होते याला हायपोग्लायसिमिया असे म्हणतात. याबद्दलही माहिती सर्वाना असली पाहिजे. जेणेकरून या आजारामुळे जीवघेणी होणारी धावपळ टाळता येणे शक्य होईल.
मधुमेह हा काही क्षयासारखा आपला शत्रू नाही. पण गेल्या काही दशकांपासून मधुमेहाचे अस्तित्व तीव्रतेने जाणवू लागले व विशेषत: पाच वर्षात मधुमेहींची संख्या झपाटयाने वाढली. अक्षरश: साथ यावी याप्रमाणे घराघरात या गोड आजाराची कटुता शिरली व जो तो शुगरबद्दल बोलू लागला. मधुमेहींची वाढती संख्या अशीच राहिली तर २०३०पर्यंत भारताला मधुमेहाची राजधानी हा नामुश्कीचा किताब मिळाल्याशिवाय राहणार नाही.
धुमेहाची लागण होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मानवी शरीराच्या स्वादुपिंड या ग्रंथीमध्ये तयार होणा-या इन्सुलीनचे संतुलन बिघडते. स्वादुपिंडामध्ये असणा-या बिटा नावाच्या पेशी या संप्रेरकाचा स्रव करतात. इन्सुलीन हे रक्तातील साखर इतर पेशींमध्ये पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे मानवी शरीराला विविध कामांसाठी ऊर्जा मिळते व रक्तातील साखरेचे प्रमाणसुद्धा नियंत्रित राहते.
परंतु, विषारी पदार्थ, विषाणू संसर्ग, अनुवंशिकता व लठ्ठपणा अशा काही कारणांमुळे बिटा पेशी नष्ट झाल्या किंवा इन्सुलीनचे प्रमाण कमी झाले तसेच इन्सुलीनच्या कार्यपद्धतीत काही बिघाड झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे अवघड होते. रक्तातील साखर वरचेवर वाढत जाते व शरीराच्या इतर पेशींना सुद्धा योग्य वेळी व योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा होत नाही.
शरीराला आवश्यक तितकी ऊर्जा न मिळाल्याने चक्कर येणे, थकवा जाणवणे व भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. बाहेरचे काम व कुटुंबाची जबाबदारी यामुळे मानसिक ताण असल्याने अनेकांना मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील लोकांमध्ये या आजाराची लक्षणे मोठया प्रमाणात आढळून येतात.
मागील दोन-तीन वर्षापासून या आजाराने युवा पिढीलाही पोखरायला सुरुवात केली आहे. तरुणांमध्ये हा मधुमेह दिसून येत असल्याने देशाचे भविष्यच अंधा-यात जात असल्याचे दिसत आहे. कारण, मधुमेहाची लागण झाल्यास मेंदू, हृदय, यकृत व मूत्रपिंड या अवयवांवर वाईट परिणाम होऊन लवकरच मृत्यू येऊ शकतो. तसेच डोळ्यावर परिणाम होऊन दृष्टी जाण्याचीही दाट शक्यता असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार मधुमेहासाठी लागणारा खर्च प्रचंड आहे. २०११ मध्ये भारताचा ३८ अब्ज डॉलर्स एवढा खर्च मधुमेहामुळे झाला होता. तर भारतासारख्या विकसनशील देशात सर्वसामान्य कुटुंबाचे २५ टक्के उत्पन्न फक्त मधुमेहाच्या उपचारांसाठी खर्च होते. त्यामुळे मधुमेहावर मात करणे हे सध्या मोठे आव्हान देशासमोर आहे.
उघडयावरील पदार्थ खाणे, मानसिक ताणतणाव, नियमित व्यायाम न करणे, खाण्यावर नित्रंयण नसणे, वाढत्या पोटाच्या घेराकडे दुर्लक्ष करणे, तसेच लहान मुलांमधील लठ्ठपणा ही मोठी समस्या आपल्याला प्रकर्षाने जाणवू लागली असून भविष्यात मधुमेहाची लागण होण्याची ही सुरुवात आहे.
रक्ताच्या चाचणीवरून मधुमेह आहे की नाही ते कळू शकते. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. मधुमेह हा चोरपावलांनी काम करणारा आजार आहे. त्यावर मात करण्यासाठी योग्य आहार, रोज व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. आरोग्यासाठी सरकार योजना आखत राहील; पण आपले आरोग्य सांभाळणे आपल्याच हातात आहे, हे विसरून चालणार नाही.
 Diabetes

No comments:

Post a Comment