Thursday, April 21, 2016

कलाकार आणि फसव्या जाहिराती!



उत्पादनाची धडाकेबाज आणि आकर्षक जाहिरात करण्यासाठी कलाकारांचा सहभाग अनिर्वाय ठरत आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांकडून कोटयवधी रुपये मोजले जात आहेत.
maggiउत्पादनाची धडाकेबाज आणि आकर्षक जाहिरात करण्यासाठी कलाकारांचा सहभाग अनिर्वाय ठरत आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांकडून कोटयवधी रुपये मोजले जात आहेत. इतकेच नव्हेतर उत्पादकसुद्धा आपल्या वस्तू प्रसिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्ती लढवत आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथे मॅगी शरीरासाठी अपायकारक असल्याचे आढळून आल्यानंतर देशभरात मॅगीवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न सुरू असताना मॅगीची जाहिरात करणारी बॉलिवुड अभिनेत्री माधुरी दीक्षितला हरिद्वारमधील अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
माधुरीला नोटीस बजावण्यात आल्यानंतर प्रत्येक वृत्तपत्राने तिचे छायात्रित प्रकाशित करून सविस्तर वृत्त दिले. परंतु, सतत पेज ३ वर झळकणा-या माधुरीसाठी पेपरमध्ये चमकणं हे काही नवीन नाही.
मात्र, तिच्यामुळे लहान-थोरांपर्यंत प्रसिद्ध असलेली ही मॅगी वृत्तपत्रात झळकली. अशाप्रकारे काहीही न करता उत्पादक मॅगीची खूप मोठी जाहिरातबाजी करून गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एफडीए या पदार्थावर बंदी घालेल की नाही? हा विषय वगळता. मॅगीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे भविष्यात मॅगीच्या उत्पादकाला नक्कीच सुगीचे दिवस येतील, असेच म्हणावं लागेल.
कुठेही आणि कधीही भूक लागली की छोटयापासून तर मोठयांपर्यंत सर्वाना एकच पदार्थ माहिती आहे, तो म्हणजे मॅगी. अगदी दोन मिनिटात होणारा हा पदार्थ आहे. सर्वच जण हे आनंदाने खातात. परंतु, काही दिवसांपूर्वीच या मॅगीमध्ये मोनोडियम ग्लुटामेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळताच त्यांनी केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला माहिती दिली. यामुळे मॅगीवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू होते. असे असतानाच आता टीव्हीवर मॅगीची जाहिरात करणा-या माधुरीला एफडीएकडून नोटीस पाठविण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
‘जाहिरात’हा आजच्या लोकप्रिय कलाकारांचा आणि मॉडेल्सचा बक्कळ पैसे कमवून देणारा साईड बिझनेस ठरू लागला आहे. त्यामुळे साबणाची जाहिरात असो किंवा सौंदर्यप्रसाधनाची जाहिरात असो, यात कलाकार उत्पादनाची स्तुती करतात आणि ग्राहकांना त्याच्या वापराचा आग्रह धरतात. हे आवाहन वस्तूचा खप वाढविण्यास मदत करते आणि विक्री वाढून उत्पादकाचा फायदा होतो, हे साधं गणित आहे. याशिवाय सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ सध्या भलतीच तेजीत आहे.
ठरावीक दिवसात चेहरा उजळेल असा दावा जाहिरातीच्या माध्यमातून केला जातो. अमूल पावडर दुधात मिसळून पियाल्यास उंची वाढेल, दात बळकट होतील, कारची जाहिरात करता उत्तम मायलेज देणारी कार आहे, असे दावे सतत जाहिरातीत केलेले दिसतात. औषधांची जाहिरात करताना अवास्तविक आशा दाखवल्या जातात. तसेच केसांचे सौंदर्य फुलविणा-या आणि केसांचे आरोग्य जपण्याचा दावा करणा-या अशा उत्पादकांच्या दाव्यातील सत्यता तपासली जाते का? तर नाही..अनेकदा या जाहिरातींचे दावे फोल ठरलेले असतात. मात्र, सर्वसामान्य ग्राहक यांसारख्या फसव्या जाहिरातींना बळी पडतात.
इतकेच नव्हेतर काही उत्पादकांच्या वस्तू वापरण्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता सरकारने ‘मिसलिडिंग अ‍ॅडव्हर्टाईजमेंट’चे नियम कडक केलेले आहेत. या कायद्याद्वारे जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे उत्पादनाचे फायदे मिळाले नाहीत तर उत्पादकाप्रमाणे ती जाहिरात करणा-या कलाकारांनासुद्धा जबाबदार धरण्यात येत आहे. असे असताना सुद्धा अशाप्रकारच्या जाहिरातींचा प्रसार वाढत असताना दिसून येत असल्याचे आश्चर्य वाटते. तसेच कलाकार ज्या उत्पादनाची जाहिरात करताना त्या वस्तू कलाकार स्वत: वापरतात का? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.
जर वापरत नसतील तर त्यांनी इतरांना या वस्तू वापरण्यासाठी सांगणे कितपत योग्य आहे. याचा विचार कलाकारांनी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोटयवधी रुपये मिळत असल्याने या कलाकारांना इतर सर्व परिस्थितीचा विसर पडला की काय असे वाटते.
विशेषत: मॅगीच्या जाहिरातीमुळे माधुरी दीक्षित हिच्यावर हरिद्वारमधील अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली. मात्र, असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी समाजावर होणा-या वाईट परिणामांची पर्वा न करता जाहिराती केलेल्या आहेत. जसे, दारूच्या जाहिराती..बनावट औषध इत्यादी. त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही. सध्या सर्वाचे लक्ष केवळ मॅगी उत्पादकांवर असल्याने याची जाहिरात करणा-या नायिकेला याच मुद्दामहून गोवण्यात येत आहे.
याचाच अर्थ नोटीस माधुरी दीक्षितला नसून तिच्या आधारे मॅगीची जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादकांचा हा छुपा डाव आहे की काय? असा प्रश्न पडतो. त्यामुळे अशा बनावट आणि आरोग्याला घातक असणा-या जाहिरातींवर ख-या अर्थाने बंदी घालायची असल्याची अशा जाहिराती करणा-या सर्व कलाकारांना कडक शासन होणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर बाजारात आलेल्या वस्तू बनावट निघाल्यास ग्राहकांनी याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी शासनातर्फे एक हेल्पलाईन सुरू करण्यात यावी, जेणेकरून बनावट वस्तूंच्या उत्पादनाला चाप बसेल.

No comments:

Post a Comment