आरती जाधव
मुंबई-
जन्माआधी गर्भलिंग चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा असतानाही आजही काही
ठिकाणी अवैधरीत्या गर्भलिंग चाचण्या करून डॉक्टर्स लाखो रुपयांची उलाढाल
करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या
माहितीनुसार, पूर्वी खुलेआम गर्भलिंग चाचण्या केल्या जात होत्या. परंतु आता
अत्यंत गुप्त पद्धतीने गर्भनिदान होत आहेत.
जन्माआधी गर्भलिंग चाचणी करणे हा
कायद्याने गुन्हा असतानाही आजही काही ठिकाणी अवैधरीत्या गर्भलिंग चाचण्या
करून डॉक्टर्स लाखो रुपयांची उलाढाल करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर
आले आहे.
गर्भलिंग तपासणीनंतर ते अर्भक मुलगा असेल
तर ‘गणपती बाप्पा’ अथवा मुलगी असेल तर ‘जय माता दी’ अशी देवतांच्या
नावांवरून सांकेतिक भाषा वापरण्यात येते. डॉक्टर या सांकेतिक भाषेत
रुग्णांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे गर्भलिंग चाचणीत मुलगी असल्यास लगेच
गर्भपात केला जात असल्याने राज्यात मुलींच्या संख्येत मोठया प्रमाणात घट
होताना दिसून येत आहे. विशेषत: उच्चभ्रू वर्गातील लोकांमध्ये गर्भनिदान
करण्याचा कल अधिक आहे.
प्रसूतीपूर्व गर्भनिदान चाचणी करणे
कायद्याने गुन्हा आहे. या कायद्यानुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलतर्फे
गेल्या काही वर्षात राज्यभरात गर्भलिंग निदान चाचणी करणा-या ५००हून अधिक
डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. यातील दोषी ५८ डॉक्टरांवर कारवाई करण्यात
आली असून त्यांच्याकडील सोनोग्राफी मशीन ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
स्त्रीभ्रूणहत्या या गंभीर सामाजिक
समस्येविरोधात विविध स्तरांवर स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. परंतु
सरकारने कायद्याने गर्भपातावर बंदी आणल्यानंतर या गर्भलिंग चाचण्या आता
अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात येत आहेत. यासाठी या चाचणी करणा-या डॉक्टरनी
शक्कल लढवत देवतांच्या नावांचा वापर केला जात आहे. गणपती-महालक्ष्मीचे
छायाचित्र दाखवून अनेक डॉक्टर चुकीच्या पद्धतीने पैसे कमवत असल्याचे उघडकीस
आले आहे.
मुळात दोन वर्षापूर्वी या घटना निदर्शनास
आल्याने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने प्रत्येक सोनोग्राफी केंद्रामधून
क्ष-किरणतज्ज्ञ डॉक्टरना देवी-देवतांचे फोटो दवाखान्यातून काढून
टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु कायद्याला बासनात बांधून अवैध
गर्भलिंग निदान चाचण्या सुरूच आहेत.
याबाबत क्ष-किरणतज्ज्ञ डॉ. सुनीता दुबे
म्हणाल्या, राज्यातील बहुतांश डॉक्टर आपल्या सोनोग्राफी केंद्रात देवतांची
छायाचित्रे लावून वैद्यकीय व्यवसायाचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास
आल्यामुळे सरकारने दवाखान्यात देवतांचे फोटो लावू नयेत, अशा सूचना डॉक्टरना
दिल्या होत्या.
मात्र, गर्भलिंग निदान कायदा
(पीसीपीएनडीटी)मध्ये देवतांचे फोटो न लावण्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने
हे चुकीचे असून रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांवर होणारा हा अन्याय आहे. अशा
प्रकारचा अवैध व्यवसाय अद्यापही काही ठिकाणी सुरू आहे. परंतु कोणीच काही
बोलू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
गुन्हा करणा-या या डॉक्टरांच्या
सोनोग्राफी मशीन ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र, पुराव्याअभावी ते
जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा असा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतात. मात्र
आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असणारे डॉक्टरना मात्र याचा नाहक त्रास होतो,
असेही डॉ. दुबे म्हणाल्या.
No comments:
Post a Comment