Thursday, April 21, 2016

वैद्यकीय क्षेत्राचे होतेय बाजारीकरण

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची प्रत्येक तरुण-तरुणींची इच्छा असते. परंतु, महागडे आणि वेळकाढू शिक्षण पूर्ण करण्यास ६-७ वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.
doctorवैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची प्रत्येक तरुण-तरुणींची इच्छा असते. परंतु, महागडे आणि वेळकाढू शिक्षण पूर्ण करण्यास ६-७ वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. शिक्षण पूर्ण होईपर्यंत वयाची तिशी पार होते. वैद्यकीय शिक्षण घेत असताना रुग्णांची सेवा करण्याची इच्छा बाळगून प्रत्येक विद्यार्थी अव्वल येण्यासाठी स्पर्धेत उतरतो.
महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविण्याच्या स्पर्धेच्या नादात बाहेरील ख-या जगातील सुरू असलेल्या स्पर्धेचे त्याला भानच नसते. ज्यावेळी खासगी किंवा सरकारी महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून विद्यार्थी आनंदात बाहेर पडतात तेव्हा ते वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायात वाढलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांमधील स्पर्धेशी एकरस होतात.
आपले महाविद्यालय एक डबकं होतं, जग हे विशाल महासागर आहे. या सागरात जिवंत राहायचे असल्यास पोहोल्याशिवाय पर्याय नाही, असे मानून पैसा हाच केंद्रस्थानी ठेवून या व्यवसायात उतरतात. सध्याच्या या बदलत्या जीवनशैलीत हे अत्यंत स्वाभाविक झाले आहे.
पूर्वी प्रतिष्ठा, पैसा या व्यतिरिक्त रुग्णसेवा या व्यवसायाकडे समाजसेवेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षात औषध कंपन्या, डॉयग्नॉस्टिक सेंटर मोठमोठय़ा रुग्णालयांमध्ये पैसा ओतून पूर्णपणे व्यवसायिकत्त्वावर काम करण्यासाठी उतरल्या आहेत.
उदाहरण सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच देशातील अग्रगण्य मानली जाणारी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडील या कंपनीने डॉक्टरांच्या सल्लाशिवाय ऑनलाईन औषधांची विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने या कंपनीवर कारवाई केली होती. अशाप्रकारे वेबसाईटच्या माध्यमातून औषधांच्या सरेआम विक्री करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत असून हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
आताच्या तुलनेत काहीकाळ मागे जाऊन प्राचीन काळात डोकावून पाहिले तर आयुर्वेदशास्त्राद्वारे कोणत्याही आजारावर सहज मात करता येत होती. आजही याचा प्रभाव कायम आहे. पूर्वी प्राचीन भारतीय आयुर्वेदशास्त्रातील अधिकारी वैद्य असो किंवा पशुपालक असो पैसा हा रुग्णसेवेपेक्षा दुय्यमच मानला जात होता.
जगभरात या व्यवसायाकडे रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. त्यानंतर कालांतराने विविध आजारांच्या तक्रारी आणि त्यावरील उपायासाठी घरचा वैद्य म्हणजेच आजीबाईचा बटवा प्राथमिक उपचार म्हणून सर्वानाच चांगलाच ठाऊक आहे. परंतु, आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजीबाईचा बटवा हरवत गेला.
इतकंच नव्हेतर भूतकाळात गेल्यावर लक्षात येते की, पूर्वी कुटुंबातील एकाही सदस्यांची तब्येत बिघडल्यास ठरावीक एकच वैद्य असायचा. त्या डॉक्टरांला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या प्रकृतीबाबत खडान् खडा माहिती असे. स्पेशालिस्टकडे जाण्याची आवश्यकता भासत नव्हती.
फॅमिली डॉक्टर हा रुग्णांच्या सुख-दु:खात, चांगल्या-वाईट प्रसंगात कुटुंबातील एक सदस्य म्हणून सहभागी होत असे. त्यामुळे रुग्णांचीही डॉक्टरांवर एकप्रकारचे श्रद्धा होती. रुग्ण व डॉक्टर यांची नाळ एकमेकांना जोडली गेलेली होती. दोघांमध्ये एका विश्वासाचं दृढ नातं होतं. परंतु, आता तो विश्वास संपल्यातच जमा आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे वैद्यकीय क्षेत्रातही नवनवीन बदल झाले. चांगल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विज्ञानाशी जोडले गेले. मात्र, यामुळे देशातील जनतेचे आरोग्य सुधारले आहे, असे म्हणता येणार नाही. कर्करोग दिवस असो किंवा क्षयरोग दिवस असो आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक डे सरकारतर्फे उत्साहात साजरे करण्यात येतात.
वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन त्या दिवशी करण्यात येते. परंतु, असे असताना मागील इतक्या वर्षात महाराष्ट्रातील जनतेच्या पदरात कोणत्या सोयी-सुविधा पडल्या याचा विचार करण्याची वेळ आली आहे. वैद्यकीय सेवा ही अत्याधुनिक गरजेपैकी असून या सेवेचे नियोजन लोकाभिमुख नाहीत. या कारणामुळेच सर्वसामान्य जनता सोयी-सुविधांपासून अद्यापही वंचित आहे.
शहरी भागातील वाढती लोकसंख्या आणि अनियंत्रित प्रगतीमुळे सर्व प्रकारच्या प्रदूषणात अडकलेली शहरे या सर्वासाठी पुरेशी आरोग्य सेवा सुविधा मागील अनेक वर्षापासून त्याच असून त्याच सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा जवळपास कोलमडूनच गेलेली आहे. आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य सेवा तर समस्यांच्या कचाटय़ात सापडली आहे.
मुळात सरकारी खासगी वैद्यकीय क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवलेले नाही. त्यामुळे रुग्णांना रास्त दरात सेवा आणि औषधांची उपलब्धता ही बाजारपेठेतील स्पर्धेच्या नियमावर सोडून दिले आहे. त्यामुळे,आर्थिकदृष्टय़ा कमकुवत, गरजू आणि मध्यमवर्गीय सर्वसामान्य जनता महागाईच्या जाळ्यात अडकलेली आहे.
याशिवाय सरकारकडून मोठे उद्योगपती, राजकीय नेते किंवा कलावंतांच्या स्मरणार्थ शहरांमध्ये मोठ-मोठे भूखंड रुग्णालय उभारण्यासाठी मोफत दरात मिळवितात. त्या भूखंडावर कालांतराने मोठी वातानुकूलित रुग्णालये उभारली जातात.  परंतु, अशा आलिशान रुग्णालयांमध्ये गरीब, गरजू आणि मागासवर्गीय रुग्णांसाठी काही खाटा आरक्षित ठेवणे बंधनकारक असते. परंतु, पैसे कमाविण्याच्या स्पर्धेत धावत सुटल्याने सरकारच्या या नियमांचे पालन बहुतांश रुग्णालये करताना दिसून येत नाही.
कालांतराने ही रुग्णालये नामांकित झाल्यास सामाजिक बांधिलकी आणि रुग्णांच्या सेवेसाठी उभारली असल्याचे सोयीस्करपणे विसरून जातात. जागतिकीकरणाच्या जमान्यात विविध क्षेत्रांत बदल होताना दिसून येत आहे. हे सर्व बदल आपण खुल्या मनाने स्वीकारत सुद्धा आहोत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा अशा प्रकारच्या बदलांची आवश्यकता आहे. मात्र, हे बदल अद्याप करण्यात आलेले नाही, याचीच खंत वाटते.
दरवर्षी खासगी किंवा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी प्रचंड लोकसंख्येत प्रत्येक जण आपले अस्तित्व शोधत असतो. कारण, इंजिनीयरची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच चांगल्या पगाराची नोकरी मिळून ते उत्तम आयुष्य जगू लागतात. परंतु डॉक्टरांची पदवी घेतलेल्यांना मात्र नोकरी मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यातूनही नोकरी न मिळाल्याने पदरात निराशा पडते.
बदलत्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर हा एक महत्त्वाचा घटक असून तोही एक माणूस आहे. त्यालाही त्याचे कुटुंब आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. कारण, आपण जसे आनंददायी आणि सुख-समाधानी जीवन जगतो तसेच आयुष्य डॉक्टरालाही जगता आले पाहिजे.  हे प्रत्येकाने लक्षात घेण्यापूर्वी त्यामागील कारणेही जाणून घेतली पाहिजेत.
प्राचीन काळी या व्यवसायाकडून केवळ रुग्णांची सेवा करण्याची अपेक्षा होती. त्यामुळे या वैद्यकीय व्यवसायाकडे समाज आजही त्यात दृष्टिकोनातून पाहत आहे. यात समाजाची काहीच चूक आहे, असं मला वाटत नाही. कारण, आपण जे पाहतो,अनुभवतो त्याचप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे डॉक्टरने नेहमी डॉक्टर म्हणून न वावरता पालक या नात्याने रुग्णांची सेवा करून त्यांचा विश्वास जिंकला पाहिजे. परंतु सध्या उच्चवर्गीय समाजातील लोकांसाठी असलेल्या आलिशान रुग्णालयात डॉक्टर्स रुग्णाशी आपुलकीने वागताना फारसे दिसून का येत नाही हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो आणि तो स्वाभाविकच आहे.
जागतिकीकरणाच्या या काळात वैद्यकीय क्षेत्रात होणारे नवनवीन बदल आपण टाळू शकत नाही. परंतु, या बदलामुळे मानवी चेहरा हरवणार नाही याची काळजी घेण्यासाठी या वैद्यकीय क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणा-या नवोदित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच त्यांची या व्यवसायाविषयीची आवड, कल व रुग्णांशी जोडले जाणारे भावनिक नाते विचारात घेतले जावे, जेणेकरून या व्यवसायात पडून पैशाच्या मागे धावताना काळाच्या पडद्याआड जात असलेल्या डॉक्टरांची माणुसकी टिकून राहील आणि कालांतराने भविष्यात रुग्ण व डॉक्टरांचे नाते अधिकच दृढ होईल.

No comments:

Post a Comment