आरती जाधव
क्रिकेट मैदान असो किंवा
निवडणुकीचा आखाडा असो यांच्या निकालापूर्वी अंदाज बांधण्यासाठी मोठ-मोठे
राजकारणी नेते सट्टे लावताना आपण ऐकले असेल. परंतु आता ही राजकारणी मंडळी
आपल्या स्वार्थासाठी सण उत्सवावर सुद्धा सट्टे लावत फिरू लागली आहेत. जास्त
थर लावणा-या पथकाला लाखो रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे आमिष दाखवून
सणाच्या नावाखाली गरीब, बेरोजगार तरुणाईच्या भावनांशी खेळत आहेत.
दहीहंडी
हा केवळ उत्सव नसून, आपली संस्कृती-परंपरा आहे. मागील अनेक वर्षे केवळ
महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या दहीहंडीने मानाचे स्थान
पटकावले आहे. गोपाळकाला हा सण महाराष्ट्रात समूहाने एकत्रित येऊन साजरा
करण्याचा उत्सव आहे. बाल्यावस्थेतील श्रीकृष्णाने गायी चरताना आपल्या
सवंगडय़ांसह सर्वाच्या शिदो-या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व
तेथूनच दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली.
जमेल तितक्या उंचीवर मानवी मनोरे रचून,
एकावर एक थर रचून त्यावर उभ्या राहिलेल्या एक्क्याने आपल्या मुठीने ती हंडी
फोडण्याची ही परंपरा आहे. गोकुळनगरीत रंगलेला हा हंडीचा खेळ फक्त
महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पोहोचला.
‘गोविंदा आला रे आला.. मटकी संभाल
ब्रिजलाला..’असे म्हणत देशभरात गोकुलाष्टमीचा सण मोठय़ा थाटामाटात साजरा
व्हायचा. दोन्ही बाजूंनी दोरखंडाच्या आधारे दहीहंडी बांधली जायची.
आंब्यांची पाने, फळ, फुले आणि काही दहा-वीस रुपये या दोरीला बांधलेले
असायचे. दहीहंडी फोडून सर्व वस्तू मिळविण्यासाठी दोन पथकांमध्ये स्पर्धा
रंगायची. परंतु कालांतराने या स्पर्धेला व्यावसायिक स्वरूप कधी प्राप्त
झाले.. हे कोणालाच कळले नाही.
वस्ती-वस्तीत नव्हे तर गल्लोगल्लीत,
चाळीमध्ये सोज्वळ आणि अत्यंत साध्या पद्धतीने फोडण्यास सहज शक्य होणारी
दहीहंडी.. ३० ते ३५ फुटांवर कधी पोहोचली याचं भानही लोकांना राहिले नाही.
राजकारणी आणि गुंडांच्या ताब्यात गेलेल्या या सणाच्या निमित्ताने लोकांकडून
लाखो रुपयांची देणगी उकळण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. त्यामुळे सामाजिक
उत्सवातून बाजारीपणा डोकावताना दिसतोय. या सर्व प्रकारातून उद्भवणारे
वादविवाद आणि त्याला होणारा राजकारणाचा स्पर्श यामुळे हा सणाचे महत्त्व आणि
आनंद हरवत चाललेला आहे. अशाप्रकारे राजकारण आणि गुंडय़ांच्या ताब्यात
अडकलेला हा सण आता न्यायालयाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. राजकारणी लोक
अशा सामाजिक महोत्सवाला भल्या मोठय़ा देणग्या देऊन आपल्या पक्षाची आणि
नावाची प्रसिद्धी करण्याचे पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे
मोठ-मोठय़ा हंडय़ा लावून, एकाच दिवशी कोटय़वधी रुपयांचा बाजार मांडणारे
राजकारणी सणालाही सोडत नाहीत. तेथूनही काही फायदा होतो का? याकडेच त्याचा
कल अधिक असतो.
दरवर्षी दहीहंडीच्या सणानिमित्त सराव
करताना गोविंदा जखमी होतात; काही गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू होतो, अशा
बातम्या आपल्या कानावर पडल असतात. दहीहंडीच्या सणानिमित्त अनेक बॉलिवूड
कलाकारच नव्हे तर चिअर्स गर्लला सुद्धा हजेरी लावण्यासाठी लाखो रुपये मोजत
मंडळांचे आयोजक लहान मुलांच्या जीवाचीही पर्वी करत नाहीत. या प्रकरणी योग्य
ती ठोस पावलं उचलली पाहिजेत. मात्र, सरकार यासंदर्भात काहीच करताना दिसून
येत नाही हे अतियश लाजीववाणे आहे. पण बाल गोविंदांबाबत बाल हक्क आयोगाची
बाजू उचलून धरत काही वर्षापूर्वी उच्च न्यायालयाने १२ वर्षाखालील मुलांना
या सोहळ्यात सहभागी करून घेण्यास बंदी घातली होती.
यंदाच्या वर्षी सुद्धा सर्वोच्च
न्यायालयात यासंदर्भात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने
गोविंदा पथकात १८ वर्षावरील गोविंदा असणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. तर
दहीहंडी २० फुटांपेक्षा जास्त वाढू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले
आहेत. दहीहंडीला अवघे काही दिवस उरले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या
या निर्णयामुळे गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. चार थर
लावायला हा न्यायालयाचा निर्णय म्हणजे, या उत्सवातील मज्जा काढून
घेतल्यासारखी आहे.
महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षाच्या
संघर्षानंतर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झाला होता. पण
न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या उत्सवातील साहसच निघून गेले आहे.
त्यामुळे दहीहंडी हा सण बंद पाडण्यासाठी हे सुरू आहे का? असा प्रश्न मनात
आल्यावाचून राहत नाही. मात्र; या ताज्या घडामोडींचा फायदा पालिका
निवडणुकीसाठी कसा करून घेता येईल, याकरता राजकारणी नेत्यांनी पुन्हा डोके
वर काढायला सुरुवात केली आहे. दहीहंडीवर बंदी का? दरवेळी हिंदू सणाच्या
आडवे का येता? आता स्टूलवर चढून दहीहंडी फोडायची का? असा युक्तिवाद काही
राजकीय नेते करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल केवळ याच
वर्षापुरता दिल्याने पुढील वर्षी पुन्हा याच मुद्दय़ावरून वाद होऊन राजकीय
नेत्यांना पुन्हा झळकण्याची संधी मिळणार आहे. कारण, उंचावरून पडून मृत्यू
पावणा-या गोविंदांशी नेतेमंडळींना आपुलकी नसून निवडणुकीच्या तोंडावर
स्वत:ची व पक्षाची जाहिरातबाजी कशी होईल, याकडेच त्यांचा कल सर्वाधिक आहे.
त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे गोविंदांच्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी
आता सर्व मंडळाने पुढे येऊन सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी उंच हंडय़ा बांधल्या जातात,
तेथे बाल गोविंदांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे लोकांना का महत्त्वाचे
वाटत नाहीत? समाजातील संस्कृती, चालीरिती, परंपरा यांना पुढे न्यायचे असेल
तर काही नियम स्वत:लाच लावून घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात
विशेषत: मुंबईत त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. दहीहंडी समन्वय
समिती, आयोजक काम कसे करतात, त्यांना पैसा कुठून पुरवला जातो. आणि त्यांनी
त्याचा आयकर भरलेला असतो का? याची सुद्धा पुरेपूर माहिती त्यांनी देणे
बंधनकारक केले पाहिजे. तसे झाल्यास दहीहंडी फोडणारे तरुण मुलं, मुली तसेच
लहान मुलं सुखरूप राहतील.
No comments:
Post a Comment